पुणे : रस्त्यावर सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला हटकल्याने झालेल्या वादातून तरुणाने एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. या प्रकरणी तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
विपुल गुल्लापेल्ली (वय १९, रा. मिठ्ठापेल्ली निवास, पालखी विठोबा चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सौरभ विनायक मेथे (वय ३२, रा. प्रभु श्रीराम अपार्टमेंट, रेणुका स्वरूप शाळेजवळील गल्ली, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सौरभ २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास टिळक रस्त्यावरून निघाले होते. त्या वेळी सदाशिव पेठेतील टपाल कार्यालयासमोर गुल्लापेल्ली सिगोरट ओढत थांबला होता. रस्त्यात सिगारेट ओढणाऱ्या गुल्लापेल्लीला सौरभ यांनी बाजूला होण्यास सांगितले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी, ‘तू समाजसेवा करू नको,’ असे गुल्लापेल्ली त्यांना म्हणाला.
या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. गुल्लापेल्लीने सौरभ यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घालून तो पसार झाला. पसार झालेल्या गुल्लापेल्ली याला अटक करण्यात आली असून, पोलीस हवालदार भुजबळ तपास करत आहेत.