नव्या अनलॉक नियमावलीवर पुण्याचे व्यापारी नाराज; म्हणाले…

करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे.

Pune-Lockdown-1-1
नव्या अनलॉक नियमावलीवर पुण्याचे व्यापारी नाराज (संग्रहित फोटो)

करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील. या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे.

“जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत निराशाजनक आहे. पुण्यातील करोना रुग्णवाढीचा दर हा ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आज तर हा दर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. शासनाची नवी नियमावली पाहिली तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध कमी करायला पाहीजे होते. पुणे शहर आणि ग्रामीण भागातील नोडल अधिकारी वेगवेगळे आहेत. त्यांनी दुकानांची वेळ वाढवून द्यायला हवी असं सांगितलं होतं. मात्र परिस्थितीचा विचार न करता पुणे शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत. याला आमचा विरोध आहे. हा निर्णय तात्काळ बदलावा अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांची आहे.”, असं पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितलं आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक दि चेनचे आदेश जारी केले आहेत. ते उद्यापासून लागू होणार असून काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असेल तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune traders angry over new unlock rules rmt 84 svk88

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी