राजेश बाहेती
एके काळी ‘सातच्या आत घरात’ असलेले पुणे आता रात्री बारालाही ‘जागे’ असते. पुण्याची ही प्रतिमा दिवसेंदिवस बदलू लागली आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच आजूबाजूला लोकवस्ती वाढू लागली. सुरुवातीला कामानिमित्त येणारी ही माणसे पुण्याच्या निसर्ग सौंदर्याला भुलून पुण्यात स्थायिक होऊ लागली. त्यातून लोकसंख्या वाढत असताना पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे आणि निसर्गाचे कायम आकर्षण राहिले आहे. त्यामुळे पुणे हे बघता-बघता ‘हॉटेल हब’ झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एके काळी पुण्याच्या शांततेचे सर्वांना आकर्षण राहिले आहे. डेक्कन जिमखाना, प्रभात रोड, जंगली महाराज रस्ता, आपटे रोड, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, चतु:शृंगी परिसर, विद्यापीठ परिसर आदी ठिकाणे ही तर शांततेसाठी प्रसिद्ध. पुण्यात बालपणीचा काळ या रस्त्यांवरून हिंडण्यात, मौजमजा करण्यात गेला. पुण्यातील मॉर्डन हायस्कूलमध्ये शाळेत असताना या रस्त्यावरून फिरण्यातील मौज काही और होती. पुढे कॉलेज जीवनातही या रस्त्यांच्या निसर्गसौदर्याचा आनंद मनमुरादपणे घेतला. फग्युर्सन कॉलेज, मॉर्डन शाळा आणि दीप बंगला चौकात आमच्या कुटुंबाची किराणा मालाची दुकाने होती. या पारंपरिक व्यवसायाऐवजी मी हॉटेल व्यवसाय निवडला. तो प्रवास आता दुबईत ‘स्मना अल रफा’ हे हॉटेल सुरू करेपर्यंत पोहोचला आहे. आता जगाच्या चष्मातून पुण्याकडे पाहताना पुणे किती बदलले आहे, हे दिसू लागते. त्यामध्ये खासकरून हॉटेल व्यवसायात, हे स्पष्टपणे जाणवते.

पुण्यातील डेक्कन जिमखाना, प्रभात रस्ता, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ परिसर हा काही मोजका परिसर घेतला तरी हे रस्ते आता ‘हॉटेल लेन’ म्हणून ओळखले जातात. अनेक हॉटेलांनी हा परिसर आता गजबजू लागला आहे. या मध्यवर्ती भागाबरोबरच आयटी कंपन्यांच्या परिसरातही सध्या हॉटेलं उभी राहिलेली दिसतात. त्यामध्ये हिंजवडी, नगर रस्ता, सातारा रस्ता, बाणेर, बालेवाडी परिसर, कोथरूड हे काही परिसर दिसून येतात. भविष्यात हा परिसर हॉटेलांनी अधिक व्यापला जाणार आहे. त्यावरून अर्थातच हॉटेल व्यवसायाची आगामी काळातील गरज दिसून येते.

पुण्याच्या दैनंदिन जीवनरहाटीमध्येही गेल्या काही वर्षांत कमालीचा बदल झाला आहे. ‘सातच्या आत घरात’ ही संकल्पना केव्हाच मोडीत निघाली आहे. रात्री उशिरापर्यंत कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना आता हॉटेलची गरज प्रकर्षाने वाटू लागली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबही आठवड्यातून एक दिवस हॉटेलिंग करताना दिसू लागली आहेत. या बदललेल्या जीवनशैलीनुसार पुण्यात हॉटेल व्यवसायाने बदल करून घेतलेला दिसतो. रात्री उशिरापर्यंत हॉटेल असावेत, ही नागरिकांची गरज झाली असल्याने ती गरज भागविण्यासाठी हॉटेलांची साखळी आज पुण्यात दिसू लागली आहे.

देशात हॉस्पिटॅलिटी हा उद्याोग वेगाने वाढणारा उद्याोग आहे. हॉटेल हा हॉस्पिटॅलिटी सेवेचा एक महत्त्वाचा भाग समजला जातो. आपल्या देशातील संस्कृतीचा वारसा आणि निसर्गसौंदर्य याचे परदेशातील नागरिकांना आकर्षण आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. हॉटेल हा केवळ व्यवसायच नसून ती आता जीवनशैलीशी निगडित आवश्यक बाब झाली आहे. त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता या व्यवसायात दिसून येते.

करोनाच्या जागतिक संकटानंतर हॉटेल व्यवसायाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. मात्र, अल्पावधीतच या व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली. आता या व्यवसायातील स्थिती ही पूर्ववत झाली आहे. त्यामागे अर्थातच या व्यवसायाची आवश्यकता दर्शविते.

हॉटेल व्यवसायात संघटित आणि असंघटित क्षेत्र असते. सध्या संघटित हॉटेल साखळीचे जाळे जगात सर्वदूर पोहोचले आहे. त्यामध्ये ब्रँड म्हणून ओळख असलेली हॉटेल असतात. असंघटित क्षेत्रात लहान आणि स्वतंत्र आस्थापने असतात. त्यांचा मोठ्या साखळ्या किंवा गटांशी संबंध नसतो. पुण्यात सध्या या दोन्ही प्रकारची हॉटेलं दिसतात. मोठ्या साखळीतील हॉटेलचा जगभर प्रसार असतो. अशी हॉटेलं आता पुण्यात असल्याने पुण्याच्या नावलौकिकात भर पडत आहे. मोठी साखळी असलेल्या हॉटेलांची संख्या जास्त असते, त्या शहराची जोरात प्रगती सुरू असल्याचे मानले जाते. पुण्यात आज मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरी परिसरात मोठी साखळी असलेली हॉटेलं थाटली गेली आहेत. त्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ही पुण्याच्या ‘हॉटेल हब’ म्हणून नावलौकिकात भर पाडणारी गोष्ट म्हणावी लागेल.

मोठ्या साखळी हॉटेलशी स्पर्धा करणारी लहान हॉटेलंही त्यांची गुणवत्ता टिकवून आहेत, हे विशेष. पुण्यात काही हॉटेलं ही त्यांच्या नावाने ओळखली जातात. पुण्यात गेल्यावर त्या ठिकाणी गेल्याशिवाय पर्यटक राहत नाहीत. पुणेरी माणूस हा खास खवय्ये मानला जातो. त्यामुळे काय चांगले आहे, याची पारख पुणेरी माणसाला लगेच समजते. त्यामुळे एखादा पदार्थ किंवा हॉटेलला पुणेकरांची पसंती मिळाली की, त्याला तोड नसते. त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या युगात काही स्वत:चा ब्रँड म्हणून ओळख असलेली हॉटेल ही केवळ तग धरून नव्हे, दिमाखात सुरू आहेत. आपले वेगळेपण टिकवून आहेत, हे पुण्याचे आणखी एक वैशिष्ट्य.

हॉटेल व्यवसायाचे स्वरूप हे गरजेनुरूप बदललेले दिसते. पूर्वी पुण्यात फक्त जेवणावळीसाठी हॉटेल असल्याचे मानले जात होते. आता हॉटेलांच्या गरजेचे स्वरूपही बदललले आहे. परिसंवाद, चर्चासत्रे, व्यावसायिक बैठकी यांसाठी हॉटेलचा वापर करण्यात येतो. आता लग्नसमारंभ, वाढदिवस, बारसे यांसारखे कौटुंबिक समारंभ हॉटेलमध्ये साजरे करण्याचाही कल पुण्यात वाढला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय ही आता एक कौटुंबिक गरज झाली असल्याचे दिसते.

हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी असल्याने ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. परदेशी गुंतवणुकीमुळे हा व्यवसाय भविष्यात आणखी भरभराटीला येणार आहे. त्यामुळे पुण्यात अनेक हॉटेलं थाटलेली दिसतील. पुण्याच्या आजूबाजूचा परिसरही झपाट्याने विकसित होत आहे. उपनगरी भागात होणाऱ्या टोलेजंग इमारतींमध्ये हॉटेलं थाटली जाऊ लागली आहेत. चौफेर वाढणारी ही हॉटेलं पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनू लागली आहेत. पुण्याच्या विकासात त्यांचा हातभार वाढू लागला आहे. त्यामुळे ‘सातच्या आत घरात’ ही संकल्पना मोडीत निघण्याच्या मार्गावर असली, तरी रात्री उशिरापर्यंतची नागरिकांची गरज भागविण्याचे काम हॉटेल करत आहेत. त्यामुळे पुण्याची ओळख ‘हॉटेल हब’ अशी होऊ लागली आहे.

(लेखक हे दुबईस्थित ‘स्मना अल रफा’ हॉटेलचे संचालक आहेत.)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune vardhapan din 2025 hotel hub new idetity of pune city pune print news spt 17 asj