पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे भूसंपादनाचे क्षेत्र निश्चित कररण्यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. त्यामध्ये विमानतळासाठी किती क्षेत्र आवश्यक असून जमीन मोजणीची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मोबदल्याचा प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येणार असून जमिनीच्या मोबदल्याची रक्कम निश्चित करून त्याचे वितरण करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया येत्या महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमतिपत्रे दिलेल्या जागांची मोजणीप्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. भूसंपादनापोटी पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून विमानतळासाठी सात गावातील १ हजार २८५ हेक्टर म्हणजे तीन हजार एकर जागा संपादित करण्यात येणार आहे. यातील तीन ते चार टक्के जागा अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आलेली नाही. मात्र, नकाशाबाहेरील २४० हेक्टर जागा देण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. या संमती दिलेल्या जमिनीची मोजणीही पूर्ण करण्यात आली आहे.
पुरंदर विमानतळासाठी लागणारी जागा, विमानतळाचे क्षेत्र निश्चितीचा तपशील असलेला हा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कायद्यातील ३२-१ नुसार राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर दोन आठवड्यानंतर मोबदला तयार करण्याचे काम पूर्ण होणार आहे. मोबदला आणि परताव्याची रक्कम वाढवून मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासंदर्भातही राज्य शासनासमवेत चर्चा करण्यात येणार असल्याचे डुडी यांनी स्पष्ट केले.
भूसंपादनातील ३२-१चा अहवाल वजा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा हा एक महत्त्वाा टप्पा आहे. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
