Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding House Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरणही दिलं. मात्र, त्यानंतरही रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणाबाबत आणखी सवाल उपस्थित केले आहेत.

रवींद्र धंगेकरांनी एक्सवर (ट्विटर) पुन्हा एक पोस्ट शेअर करत त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा एक जुन्हा व्हिडीओ शेअर केला आहे. कंपनी गोखलेंची कमी आणि मोहोळांचीच जास्त वाटत असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे. तसेच मोहोळ पुणेकरांना खुशाल वेड्यात काढत असल्याचा निशाणाही धंगेकर यांनी साधला आहे.

रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

“कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही ५० टक्के भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बरं खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे. कारण यांचे ५० टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील ३०,००० कोटींच्या फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का? काय वाटतं? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय?”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावर मोहोळांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाचं जे खरेदी खत झालं, हा व्यवहार करताना पुण्यातील गोखले बिल्डर्सने ते विकत घेतलं. मात्र, माझ्यावर असा आरोप झाला की, गोखले बिल्डर्सचा मी भागीदार आहे. मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केलं की, मी शेती व्यवसाय करतो, मी दोन ठिकाणी कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करतो. गेले १५ ते २० वर्षांत मी वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम व्यवसाय करतो. एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का? मला काहीही लपवण्याची गरज नाही”, असं मोहोळ म्हणाले.

“गोखले यांच्याबरोबर मी प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या माहिती प्रमाणे दोन एलएलपी संस्था होत्या, या दोन भागीदारी संस्था आहेत, त्यातील एक संस्था २०२२ मध्ये आणि दुसरी २०२३ मध्ये तयार झाली होती. मी या एलएलपी संस्थांमधून बाहेर पडायच्या आधी देखील एकही रुपयांचा व्यवहार या दोन्ही संस्थांमधून झालेला नाही. हे सर्वजण तपासू शकता. आता जैन बोर्डिंग हाऊसच्या विषयाबाबत सांगतो की या दोन्ही एलएलपीचा मी राजीनामा देऊन २५ नोव्हेंबर २०२४ मध्ये बाहेर पडलो होतो. त्याचे हे माझ्याकडे कागदपत्रे आहेत”, असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.

“जैन बोर्डिंगच्या ट्रस्ट्रींनी १६ डिसेंबर २०२४ मध्ये ही जमीन विकसकाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक वर्तमान पत्रात या संदर्भातील त्यांनी टेंडर नोटीस देखील दिली होती. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर गोखलेंनी ही जमीन ८ ऑक्टोबर २०२५ मध्ये घेतली, म्हणजे तुम्ही पाहिलं तर हा व्यवहार कधी झाला ८ ऑक्टोबर २०२५ मध्ये आणि मी बाहेर कधी पडलो २०२४ मध्ये. मग माझा या विषयांशी संबंध कुठे आला?”, असं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलं.