पुणे :‘गुप्तचर खात्यात नोकरी’, ‘देशहितासाठी गुप्त मिशन’, ‘३८ कोटींचं बक्षीस’, ‘गृहमंत्र्यांशी थेट संपर्क’ असे आमिष दाखवून, पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल ४ कोटी ६ लाख ७ हजार ३५५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीत तक्रारदाराचे नातेवाईकच सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सूर्यकांत दत्तात्रय थोरात (वय ५३ वर्षे), रा. प्लॉट क्र. ६१, विजयी चैतन्य सोसायटी, ग्लोबल हॉस्पिटलजवळ, दत्तवाडी, पुणे, हे सारस्वत बँकेच्या सोमवार पेठेतील कार्यालयातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या ते पत्नी अर्चना थोरात यांच्यासह पुण्यात वास्तव्यास आहेत. २०१९ साली त्यांच्या पत्नीचा भाऊ सुनील बबनराव प्रभाळे यांनी संपर्क साधून सांगितले की, त्याचा मुलगा शुभम प्रभाळे हा केंद्र सरकारच्या गुप्तचर खात्यात नोकरीला असून, देशहितासाठी एका गुप्त मिशनमध्ये त्याने महत्त्वाचं काम केलं आहे. या कामाच्या बदल्यात त्याला सरकारकडून ३८ कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे, मात्र ते मिळवण्यासाठी प्रक्रिया शुल्क, कायदेशीर फी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू द्याव्या लागणार असल्याचे सांगण्यात आले.

शुभम आणि सुनील यांच्याशी संवाद वाढू लागल्यावर थोरात यांचा त्यांच्यावर अधिक विश्वास बसला. दोघांनी सांगितले की काम अंतिम टप्प्यात असून, पैसे दिल्यानंतर रक्कम परत मिळेल. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचं खोटं नाव घेतलं, त्यांच्यासोबत फोनवर ‘कॉन्फरन्स कॉल’ चालल्याचा देखावा केला. वेळोवेळी विविध कारणांनी पैसे मागण्यात आले. हा व्यवहार २०२० पासून २०२४ पर्यंत सतत सुरू राहिला. आरोपींनी संरक्षण मंत्रालयातील अर्ज, वरिष्ठ अधिकाऱ्यांना गिफ्ट, वकीलांची फी, दिल्ली प्रवास आदी कारणं सांगून लाखो रुपये घेतले.या फसवणुकीत केवळ तक्रारदार नव्हे,तर त्यांनी ओळखीच्या लोकांकडून उचलून दिलेले पैसेही आरोपींना दिले गेले.

काही व्यवहार रोख स्वरूपात झाले. तर काही थेट बँक ट्रान्सफरद्वारे करण्यात आले.आरोपींनी पैसे मिळवण्यासाठी सारस्वत बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडसइंड बँक यांसारख्या बँकांतील खात्यांचा वापर केला. व्यवहारांमध्ये शुभम प्रभाळेच्या खात्यावर थेट १.८२ कोटी, ओंकार प्रभाळेच्या खात्यावर १०.९३ लाख, प्रशांत प्रभाळे ४०.६७ लाख,सुनील प्रभाळे ७ लाख, भाग्यश्री प्रभाळे १.०५ लाख रुपये जमा झाले.याशिवाय, नातेवाईकांकडून उचलून दिलेले १७ लाख,२५ लाख,१० लाख,६.५ लाख, ३.५ लाख,३ लाख असे वेगवेगळ्या रकमेचे व्यवहारही यात समाविष्ट आहेत. एकूण फसवणुकीची रक्कम ४,०६,०७,३५५ रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.चार वर्षे फसवणुक सहन केल्यानंतर आणि रक्कम परत मिळण्याची आशा संपल्यानंतर थोरात यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी शुभम सुनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. हे सर्व आरोपी पुण्यातील धनकवडी, सहकारनगर येथील संभाजीनगर, विठ्ठल मंदिराजवळ राहणारे आहेत. प्राथमिक तपासात या सर्वांनी खोटं नाव, बनावट ओळखी, बनावट दस्तऐवज आणि खोटे बँक व्यवहार वापरून संगनमताने फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं आहे.या आरोपींच्या बँक खात्यांची चौकशी सुरू केली असून, आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.