पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याकडे कल वाढत आहे. राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठीच्या अर्जसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, एकूण अर्जसंख्येच्या केवळ दोन ते तीन टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांत वाढ होत असल्याचे राज्य मंडळाचे निरीक्षण आहे.
राज्य मंडळाने यंदा बारावीचा निकाल ५ मे रोजी, तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला. राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा दिली जाते. त्यासाठी आधी छायाप्रत घ्यावी लागते. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे अर्ज वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, दहावीला २०२३मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी १ हजार ४७० अर्ज दाखल झाले. २०२४मध्ये १ हजार ७०५ अर्ज आले होते, तर यंदा पुनर्मूल्यांकनासाठी १ हजार ७७० अर्ज दाखल झाले. बारावीला २०२३मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी २ हजार ३४१ अर्ज दाखल झाले. २०२४मध्ये संख्या २ हजार ५१७ वर गेली, तर ही संख्या जास्त वाढून ३ हजार ७३१ अर्ज दाखल झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.
गुणपडताळणी अर्जांत घट
एकीकडे पुनर्मूल्यांकनासाठी मागणी वाढत असताना गुणपडताळणीसाठी मागणी कमी होत आहे. राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, दहावीला २०२३मध्ये गुणपडताळणीसाठी २ हजार ३६७, २०२४मध्ये २ हजार ७५७, तर या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास निम्माने घट होऊन १ हजार २४६ अर्ज दाखल झाले. बारावीला २०२३मध्ये गुणपडताळणीसाठी ६ हजार ९७३, २०२४मध्ये ६ हजार १३४, तर या वर्षी केवळ ३ हजार २७८ अर्ज दाखल झाले.
प्रारूप उत्तरपत्रिकेनुसार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी होते. मात्र, आपण ज्या पद्धतीने उत्तरपत्रिका लिहिली होती, तितके गुण आपल्याला मिळालेले नाहीत, या भावनेतून विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. सर्वसाधारणपणे एकूण अर्जसंख्येच्या दोन ते तीन टक्के विद्यार्थ्यांचे गुण वाढून टक्केवारीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ