पुणे : सदाशिव पेठेतील भावे स्कूलजवळ झालेल्या अपघात प्रकरणात मोटारचालकाला विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत आरोपी मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले आहे. मोटारचालकाची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालायने दिले. अपघातास जबाबदार असलेला मोटारचालकाला मोटार चालविता येत नव्हती. तसेच, त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
सदाशिव पेेठेतील भावे स्कूलजवळ शनिवारी सायंकाळी भरधाव मोटारीने बाराजणांना धडक दिल्याची घटना घडली. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. अपघातास जबाबदार असणारा मोटारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जि. धाराशिव) याला शनिवारी रात्री विश्रामबाग पोेलिसांनी अटक केली. अपघाताच्या वेळी मोटारीत सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि मोटार मालक दिगंबर शिंदे (वय २७) होते. पोलिसांनी गोसावी आणि शिंदे यांचे जबाब नोंदविले आहेत. गोसावी आणि शिंदे यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी न्यायालयात सांगितले. पोलीस उपनिरीक्षक गणेश फडतरे तपास करत आहेत.
भावे स्कूलजवळील अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी जखमी झाले. रविवारी त्यांची परीक्षा होती. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. शासनाने विद्यार्थ्यांचा उपचारांचा खर्च करावा. शासनाने याबाबत विचार करावा.
सुप्रिया सुळे, खासदार
चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस
अपघातातील जखमींची उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी संचेती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. विद्यार्थ्यांवर आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या. पाटील यांनी दुर्घटना आणि कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे, सुनील पांडे, रमाकांत कापसे उपस्थित होते.