सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात उद्या खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे सारथी संस्थेच्या बाहेर उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहे. या संस्थेत भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. तसेच, संभाजी राजेंनी उपोषण करू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी सचिवांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. या बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी देखील यावे.
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्या पूर्वी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्‍या उमेदवाराची मुलाखत घेतली गेली. त्यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.

सकाळी सहापासून कामाला लागायची हीच माझी स्टाइल –
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजल्यापासून कामाचा धडका लावल्याचे पाहण्यास मिळाले. तर, या दरम्यान अधिकाऱ्याची चांगली धावपळ देखील पाहण्यास मिळाली. याबाबत ते म्हणाले की, सकाळी सहापासून कामाला लागायची हीच माझी स्टाइल असून, त्याला मी काय करू? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या कामाच्या पद्धतीमुळे अधिकारीही मला साथ देतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा परिषदेत मित्र पक्षांनी देखील पदे मागितली –
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या पदासाठी अनेकजण इच्छुक असून वरिष्ठांसोबत चर्चा करून उद्या नाव जाहीर केले जाईल. तसेच, महाविकासआघाडी प्रमाणे पुणे जिल्हा परिषदेत देखील मित्र पक्षांनी पदं मिळावीत अशी मागणी केली आहे. त्यानुसार वरिष्ठांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या इच्छुकांच्या मुलाखतीनंतर दिली.