पिंपरी : बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड याच्याबाबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. कराड प्रकरणावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीडमधील केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मीक कराड पसार झाला होता. पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी, तसेच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविला. खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला. गेले २२ दिवस त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. कराड मंगळवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे कार्यालयात हजर झाला. सध्या तो तुरुंगात आहेत. बीड पोलिसांनी नवीन पलंग मागविल्याने आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यावर या प्रकरणाच्या चौकशीसाठी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना काय रस्त्यावर झोपवायचे का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

हेही वाचा – धर्मसत्तेच्या जनजागृतीतून नवी राजसत्ता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आळंदी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना वाल्मीक कराड याला तुरुंगात अतिमहत्त्वाची (व्हीव्हीआयपी) वागणूक दिली जात असल्याबाबत विचारले असता ‘कुठे, कोणते प्रश्न विचारले पाहिजेत याबाबत पथ्य पाळले पाहिजे’, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर बोलणे टाळले.

हेही वाचा – गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न फसला, मोहोळच्या साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त

देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. नदी स्वच्छ करणे हे एका दिवसाचे काम नाही. विविध गावांचे, शहरांचे आणि उद्योगांचे पाणी हे नदीत सोडले जाते. हे पाणी शुद्ध करून इंद्रायणी नदीत सोडायचे आहे. त्याबाबतच्या उपाययोजनांचे काम सुरू केले आहे. संबंधित गावांना, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायती, महापालिकांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रसायन मिश्रित पाणी नदी पात्रात सोडू नये यासाठी उद्योग विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची व्यवस्था उभी करण्याचे काम सुरू केले आहे. ते काम युद्ध पातळीवर केले जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh deshmukh murder case walmik karad vvip treatment devendra fadnavis reaction pune print news ggy 03 ssb