पुणे : शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यात शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण ४३ प्रकारच्या स्पर्धा आयोजित होणार असून, या स्पर्धांमुळे शिक्षण विभागांतर्गत अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांमध्ये चुरस निर्माण होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्यातील ३३ जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, ५ प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्यामार्फत तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘एससीईआरटी’चा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांना त्यांच्यातील कौशल्य, नवकल्पना विकसित करता येणार आहेत. तालुकास्तरावरील स्पर्धेतील विजेते जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील, तर जिल्हास्तरावरील विजेत्यांना राज्यस्तरावरील स्पर्धांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
लिपिक, शिपाई, प्रयोगशाळा सहायक यांच्यासह अन्य शिक्षकेतर कर्मचारी, सर्व शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक, तसेच जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी ते केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांना या स्पर्धांत सहभागी होता येणार आहे.
उपक्रमातील स्पर्धांमध्ये स्वरचित काव्य स्पर्धा, मानसिक क्षमता, माहिती विश्लेषण स्पर्धा, एमएस वर्ड आणि एक्सेल स्पर्धा, वक्तृत्व, वाद्यवादन, ॲनिमेशन सादरीकरण, सुलेखन, कथालेखन, लोकनृत्य, रांगोळी, फोटोग्राफी, शोधनिबंध, विज्ञान आणि गणिताचा जादूगार, नाट्य, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, योगासन, बालमानसशास्त्र केस स्टडी, माहितीपट निर्मिती, मराठी, विज्ञान, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी, सामाजिक शास्त्रे ऑलिम्पियाड, हॅकेथॉन, व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन अशा एकूण ४३ स्पर्धांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या आयोजनाची उद्दिष्टे
शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्यवृद्धी; समन्वय, सहकार्य, स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे; डिजिटल, भाषिक सादरीकरण कौशल्यांना चालना देणे; अधिकारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना २१व्या शतकातील आव्हाने स्वीकारण्यास सक्षम करणे; शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाच्या तणावातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही काळ दिलासा देणे ही उपक्रमाच्या आयोजनाची उद्दिष्टे आहेत. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे पारंपरिक चौकटीला मोडून समग्र, लवचीक आणि बहुआयामी शिक्षण पद्धतीचा पाया रचते. या धोरणानुसार शिक्षकांचे सर्वांगीण व्यावसायिक सक्षमीकरण शिक्षणाच्या गुणवत्तेचा केंद्रबिंदू आहे. प्रस्तावित स्पर्धात्मक कार्यक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०मधील तरतुदींना मूर्त रूप देईल. तसेच याद्वारे शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांना सहभागी करवून घेऊन उत्साहवर्धक, प्रेरणादायी वातावरणनिर्मिती होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
