पुणे : कायद्याची व्यूहरचना, धडाडीचे नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती अशा त्रिसुत्रीच्या बळावर मुंबईच्या गुन्हेगारीस वेसण घालण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ध्यास फाउंडेशनच्या वतीने निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदनलिखित ‘द ब्रह्मास्त्र अनलीश्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त पोलीस महासंचालक ए. व्ही. कृष्णन् आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माशेलकर बोलत होते. फाउंडेशनचे  संस्थापक-अध्यक्ष डॉ. माधव सानप आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे या वेळी उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘सर्वांना काम देणारी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही गुन्हेगारीची राजधानी झाली होती. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले होते. सधन कुटुंबातील व्यक्ती आपल्या घरातील लग्नकार्य, वाहन आणि गृह खरेदी देखील मनमोकळेपणाने करू शकत नव्हते, एवढी दहशतीची पकड गुन्हेगारांनी मजबूत केली होती. टोकियो, यासुका, कोलंबिया, न्यूयॉर्क अशा जागतिक पटलावर नव्वदच्या दशकातील गुन्हेगारी जगताचे अवकाश पाहिले असता माफीयांनी धुडगूस घातला होता. मात्र, धाडसी, धैर्यशील आणि कणखर नेतृत्वानेच कायद्याच्या चौकटीत राहून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.’

कृष्णन् म्हणाले, ‘मुंबईतील गुन्हेगारी ही केवळ एन्काऊंटरने संपण्यासारखी नव्हती. तर, त्यासाठी कायद्याची जरब आवश्यक होती. मकोका कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मुंबईतील गुन्हेगारीची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढली.’

डी. शिवानंदन म्हणाले, ‘९० च्या काळात मुंबईत दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन यासांरख्या गुन्हेगारांनी दहशतवादी हल्ले, खंडणी, खूनांचे सत्र याद्वारे दहशत निर्माण केली होती. एके-४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांद्वारे मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पोलिसांनी कायद्याच्या चौकटीची वेसण घातली.’

पिंगळे यांनी आपल्या मनोगतामध्ये पुस्तकाचे अंतरंग उलगडले. ‘गुन्हेगारीमुळे केवळ मुंबईचा विकासच खुंटला नव्हता तर, विविध विचारधारांना सामवून घेणाऱ्या राजधानीची शांतता भंग पावली होती. धास्तावलेल्या मुंबईकरांना डी. शिवानंधन यांच्यासारख्या धाडसी आणि करारी पोलीस अधिकाऱ्यांमुळे मोकळा श्वास घेता आला आणि सुरक्षित वाटू लागले’ असे पिंगळे यांनी सांगितले.

सानप यांनी प्रास्ताविक केले. स्मिता रंधवे यांनी सूत्रसंचालन केले. अक्षता कुलकर्णी यांनी आभार मानले.

विदा (डेटा), कृत्रिम बु्द्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे आज गुन्हेगारीचे रंगरूप बदलले आहे. त्यामुळे या नवीन शस्त्रांचा सामना करण्यासाठी पोलिसांना सज्ज रहावे लागणार आहे. – डाॅ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ