पुणे : सुश्रूषेसाठी ठेवलेल्या नोकरांनी ज्येष्ठ नागरिकाची बनावट सही करून बँक खात्यातून ३५ लाख ५१ हजारांची रक्कम काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश ज्ञानेश लिमकर (रा. वारजे माळवाडी) आणि आदित्य संजय मोरे (रा. पाषाण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती आजारी आहेत. त्यांची देखभाल, तसेच सुश्रूषेसाठी आरोपी लिमकर आणि मोरे यांना नेमण्यात आले होते. सप्टेंबर २०२३ पासून दोघे जण त्यांच्याकडे कामाला होते. दोघांनी त्यांच्या आजारपणाचा फायदा घेतला. ज्येष्ठ महिलेच्या पतीचे नाव असलेली धनादेश पुस्तिका, तसेच डेबिट कार्ड चोरले. धनादेशावर बनावट सही करून त्यांच्या खात्यातून वेळोवेळी ३५ लाख ५१ हजार रुपये काढून घेतले. फसवणुकीचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर ज्येष्ठ महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.
मित्रमंडळ काॅलनीत घरफोडी
पुणे : मित्रमंडळ काॅलनीतील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नितीश मेहता (वय ३५, रा. अनंत बिल्डिंग, मित्रमंडळ काॅलनी, गल्ली क्रमांक १, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता व्यावसायिक आहेत. मेहता यांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, मित्रमंडळ काॅलनीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे.
रेंजहिल्स परिसरात घरफोडी
रेंजहिल्स परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ७८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील रेंजहिल्स भागातील राॅयल कॅसल सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून तीन लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.