पुणे : “जे काही घडले त्याची चिंता करण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला आपण एक वेगळी दिशा देऊ. नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती आता तयार झाली आहे. उद्या निवडणुका होतील तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक मोठी फळी दिसेल. तुम्हाला खूप मोठी संधी तयार झाली आहे. पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू. नवीन नेतृत्व युवकांच्या रुपाने महाराष्ट्राला मिळेल”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यात ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार पुढे म्हणाले की, पक्ष सोडून गेल्यावर काही लोकांनी टीकाटिप्पणी केली. लोकांना हा निर्णय पटलेला नाही हे त्यांच्या लक्षात येत आहे, त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. जोपर्यंत जागरुक माणूस या महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत परिवर्तन होत राहील. तुम्ही काय होता, तुमचा कार्यकाळ काय होता, तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारले होते आणि आज तुम्ही कुठे गेलात या सगळ्या गोष्टींचा विचार सामान्य माणूस करत असतो. आपण संधीसाधू नाही. हे जनतेला आणि तरुण पिढीला सांगावं लागेल. जे मतदारसंघ पक्षाने ठरवले आहेत, त्या ठिकाणी जाऊन ती जागा आपण घेणारच अशी पावले आपण टाकली पाहिजे, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

हेही वाचा – आळंदीत इंद्रायणी पुन्हा फेसाळली! जलप्रदूषणाबाबत प्रशासन गंभीर नाही का?

हेही वाचा – अजित पवारांकडून जोरदार हल्लाबोल, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काहींनी…”

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीदेखील बैठकीला हजेरी लावून उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड यांच्यासह आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on opposition in the meeting in pune find out what they said svk 88 ssb