पिंपरी : ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट लाडक्या बहिणींना लाभ दिला. निवडणूक संपताच कडक निकष लाऊन महिलांची नावे वगळली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत लाभ देतील. त्यानंतर केवळ २० टक्केच महिलांना लाभ मिळेल, असा दावा करून महायुती सरकार फसवे’ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी येथे केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा मेळावा गुरुवारी चिंचवड येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रोहित पवार, निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे,  कार्याध्यक्ष संतोष कवडे, विशाल काळभोर, काशिनाथ नखाते, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, प्रियंका बारसे, प्रवक्ते माधव पाटील यावेळी उपस्थित होते.

‘निवडणुकीत आश्वसनाची खैरात करायची, निवडणुकीपुरते पैसे द्यायचे आणि पुन्हा बंद करायचे हा प्रकार सुरू असल्याचा’ आरोप करून शशिकांत शिंदे म्हणाले, ‘महायुती सरकार बेफाम झाले आहे. टॉवेलवर मारामाऱ्या केल्या जात आहेत. मंत्री पैशाची पिशवी घेऊन बसत आहेत. चड्डी-बनियन गँगने धुमाकूळ घातला आहे. आमदाराच्या भावाने गोळीबार केला. या लोकांना थोडीही लाज शिल्लक राहिली नाही. विधिमंडळात मारामारी केली जाते. पोलीस लवचिक झाले आहेत. सनदी अधिकाऱ्यांपासून ८० टक्के अधिकारी हतबल झाल्यासारखे काम करीत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्यात मद्याच्या नवीन दुकानाला परवानगी दिली जाणार आहे. व्यसनाधीनता वाढत आहे. विकास कामाच्या नावावर गरिबांच्या घरावर बुलडोझर चालविला जात आहे. ठेकेदाराची ८९ हजार रुपये कोटी रुपयांची थकबाकी आहे. ठेकेदार, रोजगारासाठी तरुण आंदोलन करीत आहेत. हुंडाबळी, शेतकरी आत्महत्येचे प्रकार वाढले आहे’.

‘काहींना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. निवडणूक होईपर्यंत सोबत राहिले. निवडणूक झाली की सोडून गेले. नेते पक्ष सोडून गेले असले तरी जनता सोबत आहे. भविष्यात पक्ष सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल.  महापालिकेत प्रशासकांच्या माध्यमातून लूटमार केली जात आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करावीत. सर्वांनी एकजुटीने काम करावे. कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे.  आघाडी होईल की नाही याची चिंता करू नका, शहराचा महापौर राष्ट्रवादीला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही’, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.