शिरुर : शिरूर तालुक्यात संततधार असून नद्या, ओढे आणि नाल्यांत पाणी आले आहे. वढू वाजेवाडी-पिंपळे जगताप या रस्त्यावरील पुलाचे काम चालू असल्याने पाइप टाकून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावरून जाणारा मोटारसायकलस्वार पाण्यात पडला असता एका शाळकरी मुलीने केलेल्या मदतीमुळे मोटारसायकलस्वाराला जीवदान मिळाले.

मांडवगण फराटा ते कोळगाव रस्ता या मार्गात असलेल्या ओढ्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. वढू वाजेवाडी-पिंपळे जगताप या रस्त्यावर पुलाचे काम चालू असल्यामुळे बाजूने पाइप टाकून केलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.

गोपीनाथ शेलार हे मोटारसायकलस्वार तेथून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकलसहीत ते खोल पाण्यात पडले. त्यावेळी संभाजी फराटे यांची नात अनुष्का धनंजय फराटे ही क्लासवरून घरी जात होती. ती दुसऱ्या बाजूला पुलाच्या कडेला उभी होती. त्यावेळी अनुष्काने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांना बाहेर काढण्यासाठी धावली. तेव्हा तिने गोपीनाथ शेलार यांना मोटार सायकलला पकडायला सांगितले आणि मोटारसायकल तिने वर ओढली. त्यामुळे शेलार हे सुखरूप पाण्याबाहेर आले. इयत्ता दहावीत शिकत असलेल्या मुलीचे धाडस अभिमानास्पद असून, तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, पुलाचे काम चालू असल्याने नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यावरूनही पाणी जात असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि पाटबंधारे खात्याचे रणजित धायगुडे यांनी सांगितले.