पुणे : महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सातारा येथील इतिहास अभ्यासक प्रदीप पाटील यांना श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी (११ ऑगस्ट) सिम्बायोसिस विश्वभवन सभागृह येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हेही वाचा : पुणे : वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची बदली, राज्यातील उपायुक्त दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. गो. ब. देगलूरकर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत आणि अमृत पुरंदरे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराचे स्वरूप असून ५० हजार रुपये आणि प्रशस्तिपत्रक असे श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे, असे महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानचे सचिव अभिषेक जाधव यांनी कळविले आहे.