केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी पुणे शहरातील नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आंबेगाव बुद्रुक, कात्रज बायपास रोड लगत असलेल्या शिवसृष्टीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवसृष्टी प्रकल्प लवकर पूर्ण होईल, यासाठी निधी देखील दिला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपाचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार योगेश टिळेकर, पुणे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसृष्टी प्रकल्प पाहण्याची माझी इच्छा होती, तो पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांचं दैवत आहे. शिवसृष्टी प्रकल्प लवकर पूर्ण होईल, त्यासाठी निधी देखील दिला जाणार आहे. माझ्या हस्ते शिवसृष्टीच्या बाजूने जाणार्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याचा योग आला आहे. त्याबद्दल मी समाधानी असल्याचेही गडकरी म्हणाले.
यावेळी कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि कात्रज येथील प्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी साउंड बॅरिअर (ध्वनिरोधक व्यवस्था) बसवण्यात येणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. तसेच देशभरातील पर्यटक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला भेट देतील , तेव्हा त्यांना सुविधा व्हावी या दृष्टीने सर्व कामं तातडीने मंजूर झालेली असल्याचे सांगत, छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचं बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
