पुणे : शुभम कोमकर खून प्रकरणातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा पुतण्या शिवम आंदेकरसह चार जणांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र – गुजरात सीमेवर अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष उर्फ गोविंद कोमकर याच्या खुनानंतर सहा प्रमुख आरोपी फरारी होते. नऊ दिवसांनंतर ते पोलिसांच्या हाती लागले. या गुन्ह्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर याच्यासह सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी ( मकोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आंदेकर कुटुंबियांच्या बेकायदा बांधकामाबाबत पुणे शहर पोलिसांनी महापालिका प्रशासानाशी पत्रव्यव्हार केला आहे. या टोळीचा आंदेकर कुटुंबियांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पाडण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आंदेकर याच्या घराच्या झडतीमध्ये ७० लाख रुपये किंमतीचे सोने आणि जमिनीची कागदपत्रे आढळली. त्याबाबत कसोशीने तपास जारी करण्यात आला आहे.

वर्चस्वाच्या वादातून तसेच कौटुंबिक भांडणातून आयुष कोमकर याचा ५ सप्टेंबर रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर आणि कुटुंबातील नऊ जणांसह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आठ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली. फरारी असलेल्या शिवम उदयकांत आंदेकर (वय ३१), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१) आणि शिवराज उदयकांत आंदेकर (वय २०, सर्व रा. नाना पेठ) या आरोपींना शनिवारी सायंकाळी गुजरात सीमेवर अटक करण्यात आली.