लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: विश्वाचा ९५ टक्के भाग व्यापणाऱ्या कृष्णपदार्थांच्या मोठ्या रचना गुरुत्वीय भिंगाद्वारे (ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग) अभ्यासता येणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, कृष्णपदार्थांचा विस्कळितपणा अपेक्षेपेक्षा कमी आढळल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता कृष्णपदार्थांच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली आहे.

आतंरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांच्या नेतृत्वातील खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने कृष्णपदार्थांबाबतचे संशोधन केले आहे. जगातील शक्तीशाली दुर्बिणींद्वारे विश्वाचे आजवर तीन वेळा सर्वेक्षण करून त्याद्वारे कृष्ण ऊर्जा आणि पदार्थांचे अस्तित्व आणि रचना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवाई येथील ‘सुबारू’ दुर्बिणीद्वारे ‘हायपर सुप्रीम कॅम’ या सखोल सर्वेक्षणाद्वारे केलेल्या अभ्यासातून पृथ्वीपासून सर्वांत दूरवरच्या दीर्घिकांचे निरीक्षण करून कृष्णपदार्थांची रचना उलगडण्यात आली.

आणखी वाचा- पुणे : ‘आरटीओ’ची कारवाई वायुवेगाने; २० हजार वाहनांवर दंडुका

थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतेनुसार अवकाशामध्ये एखाद्या मोठ्या वस्तूमानाच्या घटकाजवळून प्रकाश जातो तेव्हा तो वाकतो. या घटनेला ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणतात. लेन्सिंगमुळे दीर्घिकांचे आकार थोड्या प्रमाणात विकृत दिसतात. दीर्घिकांच्या आकारांवर छापलेले छोटे बदल शास्त्रज्ञांना मोजायचे असतात. त्यातून कृष्ण दार्थांच्या रचनेबद्दलची माहिती मिळते. डॉ. मोरे यांच्या नेतृत्वातील शास्त्रज्ञांच्या गटाने हायपर सुप्रीम कॅमद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. त्यासाठी आकाशाच्या शंभराव्या भागातील (४२० स्क्वेअर डिग्री) दूरवरच्या दीर्घिकांची निरीक्षणे घेऊन ब्रह्मांडाच्या वस्तुमानाचा विस्कळीतपणा मोजण्यात आला. त्याला ‘एस८’ म्हणून ओळखले जाते. निरीक्षणातून प्राप्त झालेला गुंठीतपणा ०.७६ असून, कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड (सीएमबी) द्वारे प्राप्त झालेल्या ०.८३ या मूल्यापेक्षा तो भिन्न आहे.

अमेरिका, जपान, तैवान या देशातील शास्त्रज्ञांचाही या संशोधनात सहभाग आहे. गेली चार पाच वर्षे हा अभ्यास सुरू होता. विश्वातील कृष्णपदार्थाचा अभ्यास करून विश्वरचनाशास्त्राच्या सिद्धातांची चाचणी आम्ही करू शकलो. विश्वातील कृष्णपदार्थाच्या विस्कळीतपणाचे कोडे एकतर आमची चूक दाखवेल किंवा आपली विश्वरचनाशास्त्राची कल्पना तरी बदलले. आयुकाच्या नेत्तृत्त्वामुळे भारतातील अनेक शास्त्रज्ञांना वेरा रुबीन एलएसएसटी या सर्वेक्षणाद्वारे घेतलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करता येईल. रुबीन एलएसएसटी २०२४पासून दहा वर्षे जवळपास अर्ध्या आकाशातील दूरच्या दीर्घिकांची निरीक्षण करणार आहे. -डॉ. सुहृद मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयुका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sightings of invisible black matter due to gravitational lensing pune print news ccp 14 mrj