बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून महापालिकेला हा प्रश्न सोडविण्यास विलंब होत असेल तर लोकसहभागातून पाणी प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले. महापालिकेने आवश्यक परवानगी आणि पायााभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर येथे रविवारी बैठक झाली. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर,माजी नगरसेवक अमोल बालवडकर, बाबुराव चांदोरे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, भाजप शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, लहू बालवडकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सूस, म्हाळूंगे ही गावे महापालिकेत नुकतीच नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सध्या पायाभूत सुविधा महापालिकेकडे नाहीत. त्या उभ्या करण्यासाठी काही वेळेची आवश्यकता आहे. पण बाणेर, बालेवाडी, पाषाण मध्ये तशी स्थिती नाही. बाणेर बालेवाडी पाषाण मध्ये पायाभूत सुविधा आहेत, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

बाणेर बालेवाडीची पाण्याची समस्या तीन टप्प्यांत सोडविणे शक्य आहे. त्यात प्रामुख्याने पंपिंग स्टेशनचा आढावा घेऊन, संख्या आवश्यकतेनुसार वाढवणे. त्यासोबतच एकसमान पाणी वाटपासाठी मीटरची संख्या वाढवणे तसेच सोसायट्यांना मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, आदी उपाययोजना करण्याची सूचना आयुक्त विक्रम कुमार यांनी पाणीपुरवठा विभागाला केली.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी दिवसागणिक प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन ज्या उपाययोजना करत आहेत, त्या पूर्ण होऊन इथल्या नागरिकांना समान पाणीपुरवठा होण्यास नक्कीच वेळ लागणार आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी पाण्याचे वितरण करणारी व्यवस्था महापालिकेकडे नसल्याने असंख्य अडचणी येत आहेत. आजही अनेक ठिकाणी असमान पाणीपुरवठा होत आहे.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता, पुणेकरांची पाण्याची मागणी ही वाढत आहे. पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि तात्पुरता उपाय म्हणून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी दाखवत आहे. पण टँकरने पाणीपुरवठा करण्यात काही मर्यादा आहेत. त्याच्या साठवणुकीची व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी अधिकाधिक क्षमतेच्या सिमेंटच्या टाक्या उभाराव्या लागलीत. ही व्यवस्था तातडीने उभी करणे महापालिकेला शक्य नसेल, तर लोकसहभागातून २५ लाख लिटरच्या सिंथेटिक पाण्याच्या साठवणूक टाक्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.