पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराइताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. परगावी निघालेल्या तरुणीवर सराइताने बलात्कार केला. याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत २६ वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गाडे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. गाडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे.
गाडे पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके तयार केली आहेत. गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची पोलिसांनी चौकशी पोलिसांनी बुधवारी रात्री केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून गाडेचा शोध घेण्यात येत आहे. गाडेचे आई-वडील आणि भावाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांना चौकशीसाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मैत्रीण चौकशीसाठी ताब्यात

गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीत गाडेने मैत्रिणीकडे तिच्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे मोबाइल क्रमांक मागितले होते. त्यांनाही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. गाडेने आणखी काही तरुणींना त्रास दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

एसटी बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी

आरोपी गाडेचा स्वारगेट एसटी स्थानकात वावर असायचा. मंगळवारी सकाळी परगावी निघालेल्या तरुणीकडे त्याने एसटीतील वाहक असल्याची बतावणी केली आहे. ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला. त्या बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून (फाॅरेन्सिक एक्सपर्ट) तपासणी करण्यात येणार आहे. एसटी बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. संबंधित बसचालकाचा पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some more crimes by the accused in the swargate rape case 13 teams sent to search for the accused pune print news rbk 25 ssb