पुणे : पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला. प्रणव गणेश पालकर (वय २०, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अथर्व अनिल वैद्य (वय १९, रा. सवाना हाऊसिंग सोसायटी, वाघोली) जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रणव पालकर आणि त्याचा मित्र अथर्व वैद्य हे २ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्य सुमारास पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार प्रणव याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात प्रणव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी अवस्थेतील प्रणव आणि त्याचा मित्र अथर्व याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रणव याचा रुग्णालयात मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांंनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताच्या घटनेची नोंद कोथरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

पौड फाटा येथील उड्डाणपुलावर भरधाव दुचाकी आदळून दुचाकीस्वार मृत्युमुखी पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वर्षभरापूर्वी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला होता. कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालय परिसरात भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी सोसायटीच्या सीमाभिंतीवर आदळून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. बहुतांश अपघात भरधाव वेगामुळे घडले असून, अपघातातंमध्ये महाविद्यालयीन तरुण मृत्युमुखी पडले आहेत. कोथरूड भागात शिक्षणानिमित्त अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत.

नळस्टाॅप चौकातील खाऊगल्लीत मध्यरात्री महाविद्यालयीन तरुणांची गर्दी असते. मध्यरात्री रस्ते मोकळे असतत. कोथरूड, सिंहगड रस्ता भागात झालेल्या अपघातात महाविद्यालयीन तरुण मृत्युमुखी पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क भागात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कोंढवा भागात दुभाजकावर आदळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली हाेती. गेल्या सात महिन्यात शहर,तसेच उपनगरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात १७० जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दुचाकीस्वार मृ्त्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. ट्रक, टेम्पो, डंपर अशा अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटना घडल्याने पोलिसांनी जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे.