पुणे : औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोनशे रुग्णशय्येचे सुपर स्पेशालिटी आणि दोनशे रुग्णशय्येचे महिला रुग्णालयाचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंजुरीसाठी आरोग्य विभागाच्या सहसंचालकांकडे पाठविला आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाची औंध परिसरात ८५.१९ एकर जागा आहे. त्यातील औंध जिल्हा रुग्णालयाकडे ३५ एकर जागा आहे. या जागेवर सहा जुन्या इमारती आहेत. या इमारती सुस्थितीत नसून, त्या राहण्यासाठी धोकादायक आहेत. या इमारती एकूण ६ हजार २८२ चौरस मीटर जागेवर आहेत. या इमारतींच्या मधोमध १ हजार ८५८ चौरस मीटरची मोकळी जागा आहे. या जुन्या इमारती पाडून एकूण ८ हजार १४० चौरस मीटरची जागा उपलब्ध होणार आहे. या जागेवर नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि महिला रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी १९ सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या सहसंचालकांना पाठविला आहे.
पुणे जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी २५ लाख ४० हजार असून, पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका आहेत. याचबरोबर औद्योगिक क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्र, शैक्षणिक संस्था परिसरात आहेत. यामुळे जनतेच्या आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची अंदाजे १ हजार ५२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रुग्णालयासाठी कर्मचाऱ्यांच्या ५९६ जागा भराव्या लागणार आहेत. याचवेळी महिला रुग्णालयासाठी कर्मचाऱ्यांच्या ९७ जागा भराव्या लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांचा वार्षिक वेतनाचा खर्च ३२.३१ कोटी रुपये होणार आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
ससून रुग्णालयावर ताण
पुणे शहराची सर्व दिशांनी होत असलेली वाढ आणि जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेता शासकीय अत्याधुनिक यंत्रणेची आणि शहरात शासनाने एकही महिला रुग्णालय नसल्यामुळे या रुग्णालयांची नितांत आवश्यकता आहे. पुणे परिसरात सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे ससून सर्वोपचार रुग्णालय आहे. या रुग्णालयावर वाढत्या लोकसंख्येमुळे ताण येत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या मधोमध असलेल्या औंधमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारल्यास त्याचा फायदा दोन्ही शहरांतील रुग्णांना होईल, असेही प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
औंध जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि महिला रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आला आहे. हा प्रस्ताव राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालय उभारण्याचे काम सुरू होईल. – डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा