पुण्यातील एका शाळेत पालकांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला. यानंतर पीडित पाल्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) आणि रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. पालकांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने मुख्याध्यापिकेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये यावर आपले मत मांडले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाचीदेखील येथे आवश्यकता आहे.”
“पोलीस आयुक्तांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी”
“पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. यासोबतच राज्य शासनानेही शालेय मुलांसाठी समुपदेशनाबाबत एक कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती, मानसोपचारतज्ज्ञ आदींची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार महिलेचा सहा वर्षांचा मुलगा मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीत आहे. दोन ते तीन दिवसांपासून शाळेतील वरच्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचे मित्र पहिलीतील मुलाला त्रास देत होते. त्याला चुकीचा पद्धतीने स्पर्श करत होते. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारू, अशी धमकी विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यामुळे मुलगा घाबरला होता, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा : विद्यार्थ्यांकडून पहिलीतील मुलाचे शोषण ,मुक्तांगण शाळेतील प्रकार; मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा
याबाबतची माहिती मुख्याध्यापिका गुजराती यांना देण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मुलाची आई आणि अन्य पालकांनी सोमवारी शालेय प्रशासनाला जाब विचारला. मुलाच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, असे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.