पुणे : गेल्या तीन-चार दिवसांत पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसाने झोडपले. त्यात ताम्हिणी येथे २० ऑगस्ट रोजी एका दिवसातील विक्रमी पाऊस पडला. त्याशिवाय केवळ चार दिवसांत ताम्हिणी येथे सुमारे एक हजार मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील प्रणालीमुळे अनुकूल स्थिती निर्माण होऊन १८ ते २० ऑगस्ट या तीन दिवसांत राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार ताम्हिणी येथे २१ ऑगस्ट रोजी २०० मिलिमीटर, २० ऑगस्ट रोजी ५७५ मिलिमीटर, १९ ऑगस्ट रोजी ३२० मिलीमीटर, तर १८ ऑगस्ट रोजी ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे चार दिवसांतच ताम्हिणी येथे १ हजार १७० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, बंगालच्या उपसागरात तयार झालेली प्रणाली मोसमी वाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. ताम्हिणी हे ठिकाण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहे. बाष्प घेऊन येणारे मोसमी वारे सह्याद्री घाटमाथ्यावर अडवले जाऊन पाऊस पडतो. गेल्या काही दिवसांत ताम्हिणीसह कोयना, महाबळेश्वर, लोणावळा अशा ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. मात्र, ताम्हिणीत पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहता ताम्हिणी आणि पाऊस यांचा परस्पर संबंध समजून घेण्यासाठी भौगोलिक, हवामानशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करावा लागेल.

पुण्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस

पुणे शहराची मोसमी पावसाची वार्षिक सरासरी सुमारे ८०० मिलीमीटर आहे. तर यंदाच्या मोसमात ताम्हिणीमध्ये २१ ऑगस्टपर्यंत ७ हजार ८२८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पुणे शहरात १ ते २० ऑगस्ट या कालावधीत १०५.७ मिलिमीटर, तर १ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत ५०५.५ मिमी. पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे ताम्हिणी येथे पुण्याच्या वार्षिक सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस केवळ चार दिवसांतच पडल्याचे दिसून येत आहे.