रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने नाट्यक्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले रंगकर्मी आणि आयपार नाट्यमहोत्सवाचे संचालक विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. रूपवेध प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि मराठी रंगभूमीवर विविधांगी भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय करणारे अभिनेते डाॅ. श्रीराम लागू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवारी (१६ नोव्हेंबर) ज्येष्ठ रंगकर्मी सुनील शानबाग यांच्या हस्ते प्रसाद वनारसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या वेळी शानबाग यांचे ‘रंगमंचाचा अवकाश-काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डाॅ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे नाट्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या कलाकारांना २००४ पासून तन्वीर सन्मान आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार असे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यापूर्वी इब्राहीम अल्काझी, भालचंद्र पेंढारकर, विजय तेंडुलकर, कवल्लम पण्णीकर, सत्यदेव दुबे, विजया मेहता, गिरीश कर्नाड, गो. पु. देशपांडे, नसीरूद्दीन शाह यांना तन्वीर सन्मानाने गौरविण्यात आले. तर, चेतन दातार, रामू रामनाथन, संजना कपूर, गजानन परांजपे, वीणा जामकर, गिरीश जोशी, प्रदीप वैद्य, प्रदीप मुळ्ये, फाॅईजे जलाली, अतुल पेठे यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मात्र, डाॅ. लागू यांच्या निधनानंतर आणि त्यानंतर करोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये पडद्यामागच्या कलाकारांना मदत करण्यात आली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanveer natyadharmi award announced to prasad vanarse in pune print news tmb 01