पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखेतील पथकाने तातडीने तपास सुरू केला. खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या कोल्हापुरातील तरुणासह दोघांना गुन्हे शाखेने सापळा लावून पकडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील (वय ३३, बेकनार, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आरोपी पाटील, ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.

हेही वाचा – पुणे विद्यापीठाच्या आयुका प्रवेशद्वारावर आता ‘फेस रिडींग’द्वारेच प्रवेश; नोंदणीसाठी कर्मचाऱ्यांना १० एप्रिलची मुदत

आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बांधकाम व्यावसायिक मोहोळ यांचे मित्र आहेत. बांधकाम व्यावसायिकाने या प्रकाराची माहिती मोहोळ यांना दिली होती. मोहोळे यांनी याबाबतची माहिती सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली होती. पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांना या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. बांधकाम व्यावसायिकाने तडजोडीत दहा लाख रुपये देण्याचे मान्य करून आरोपी संदीप पाटीलला कार्यालयात बोलावले. पाटील याने त्याचा मित्र शेखर ताकवणेला बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पाठविले. पोलिसांच्या पथकाने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात सापळा लावून ताकवणेला पकडले. त्यानंतर पाटील याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाटीलने भालेकरला खंडणीची रक्कम घेऊन स्वारगेट भागात बोलावले. पोलिसांचे पथक तेथे पाेहोचले. तेव्हा पाटील तेथे आला नव्हता. तो मोटारीतून कात्रज चौकात गेला होता. तो मोटारीत असल्याने त्याचा माग काढणे अवघड झाले होते. पोलीस मागावर असल्याची चाहुल लागल्याने पाटील जागा बदलत होता. गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. कात्रज घाटातील जुना बोगदा परिसरात पाटीलला सापळा लावून पकडण्यात आले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, संजीव कळंबे, प्रताप पडवळ, प्रकाश कट्टे आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदा गैरप्रकारांमध्ये घट; बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद

कर्जबाजारी झाल्याने खंडणी

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर (स्पुिफिंग काॅल) करून आरोपी संदीप पाटीलने बांधकाम व्यावसायिकाकडे मोहोळ यांच्या नावाने तीन कोटी रुपयांचा खंडणी मागितली आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावे संपर्क साधण्यासाठी एका ॲपचा वापर करावा लागतो. आरोपी पाटील आणि त्याचा साथीदार ताकवणे यांची चौकशी सुरू आहे. आरोपी पाटील याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. कर्जबाजारी झाल्याने त्याने बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा कट रचल्याची माहिती तपासातून मिळाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The crime branch arrested two people who demanded extortion by taking name of muralidhar mohol pune print news rbk 25 ssb