पिंपरी : कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता अनधिकृतपणे शाळा सुरू करून विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल करणाऱ्या हिंजवडीतील दोन शाळेच्या मुख्याध्यापक, संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेचे मुळशी विभागाचे केंद्रप्रमुख सुरेश लक्ष्मण साबळे (वय ४७, रा.गणेशनगर वाकडरोड थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुळशीतील रुडिमेंट इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक विनीत भारद्वाज आणि एका महिला आरोपी विरोधात, तर हिंजवडीतील बुधराणी नॉलेज फाउंडेशन संचलित ब्लिस इंडिफाय इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गौतम बुधराणी, मुख्याध्यापक सिझा अली खान यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळा सुरू करण्यासाठी संस्था नोंदणी प्रमाणपत्र, शाळा परवानगी शासन इरादा पत्र मान्यता आदेश, शासन मान्यता पत्र, अन्य परीक्षा मंडळाशी संलग्न होण्यास शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र, संस्थेच्या नावे एकर जागा किंवा एक एकर जागेचे तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा दुय्यम सहाय्यक निंबधक यांच्याकडील भाडे करारनामा, इमारतीचा बांधकाम नकाशा, बांधकाम प्रारंभ व पूर्तता आदेश, शिक्षण विभागाच्या उपसंचालकांचा शाळा मान्यतेचा आदेश अशा कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते. केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी हिंजवडी परिसरातील शाळांची तपासणी केली असता या दोन शाळेच्या संचालक, मुख्याध्यापकांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता केली नाही. अनधिकृतपणे शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. भरमसाठ फी वसूल केली. शाळा अनधिकृत असतानाही अधिकृत असल्याचे भासविले. इतर शाळांना दाखल्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले घेतले. अनधिकृतपणे शाळा सुरू करून शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवून शासनाची, पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.