लोणावळा : मुसळधार पावसामुळे लोणावळा-पवनानगरला जोडणाऱ्या दुधिवरे खिंडीतील रस्ता खचला असून जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. दुधिवरे खिंडीतील रस्त्यावरुन जाणारे ग्रामस्थ तसेच पर्यटकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

लोणावळा-पवनानगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधिवरे खिंडीतील रस्ता वाहतून गेला आहे. पवनानगरकडे जाणारे ग्रामस्थ तसेच पर्यटकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. खिंडीतील रस्ता खचला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी दुधिवरे खिंडीतील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, खिंडीतील रस्ता दुरुस्ती तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली. मुसळधार पाऊस थांबल्यानंतर खड्यातील खडी बाहेर आल्याने खिडींतील रस्त्यावरुन जाणे धोकादायक झाले आहे.

खिंडीतील रस्त्याचे भूमीपूजन तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. गेल्या दोन वर्षात या रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते. वनविभागाची जागेची अडचण, नागरी भागात रुंदीकरणातील अडथळे, वीजेचे खांब, पाण्याच्या वाहिन्या अशा अनेक कारणांमुळे काम लांबले असल्याचे सांगण्यात आले. दुधिवरे खिंडीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. रस्त्याची दुरुस्ती तातडीने न केल्यास अपघात होणाची शक्यता असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर
पवन मावळातील गावांना लोणावळा शहराशी जोडणारा दुधिवरे खिंडीतील रस्ता अहो. शनिवारी आणि रविवारी पर्यटक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. पर्यटक तसेच ग्रामस्थांना जीव मुठीत धरून दुधिवरे खिंडीतील रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे.