पुणे : मिठाई विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ३५ हजारांची रोकड लांबविल्याची घटना माॅडेल काॅलनीतील दीप बंगला चौकात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिठाई विक्री दुकानाच्या मालकांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माॅडेल काॅलनीतील दीप बंगला चौकात मूळचंद स्वीटस हे मिठाई विक्री दुकान आहे. शनिवारी (४ ऑक्टोबर) मध्यरात्री चोरट्यांनी मिठाई विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातील ३५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मिठाई विक्री दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.
हार्डवेअर दुकानातून एक लाखांंचे साहित्य चोरी
हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात असलेल्या एका हार्डवेअर दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी एक लाख चार हजार रुपयांचे साहित्य (बाथरुम फिटिंग) लांबविल्याची घटना घडली. याबाबत हार्डवेअर दुकानाच्या मालकांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे ऊरळी देवाची परिसरात मास्टर सेल्स काॅर्पोरेशन हे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. प्रसाधनगृहासाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरून चोरटे पसार झाले. पोलीस कर्मचारी गायकवाड तपास करत आहेत.
‘टॅटू’ दुकानातील साहित्य लांबविले
सारसबाग चाैपाटी परिसरातील एका टॅटू दुकानात ठेवलेले ९० हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सारसबाग चौपाटी परिसरातील एका दुकानात टॅटू काढून दिले जातात. चोरट्यांनी दुकानातून टॅटू काढण्याचे यंत्र, तसेच अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर तपास करत आहेत.