बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मॅनदौस’ चक्रीवादळाची तीव्रता असून, गुरुवारी (८ डिसेंबर) रात्री उशिरा चेन्नईपासून ते सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही या चक्रीवादळाचा ठळक परिणाम जाणवणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाळी स्थिती राहणार असून, या कालावधीत कधीही पाऊस होऊ शकतो. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरधारांचीही शक्यता आहे. ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुण्याच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष; महापालिका अधिकाऱ्यांबरोबर घेणार बैठक

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्याची तीव्रता सध्या वाढत आहे. हे चक्रीवादळ सध्या ताशी १२ किलोमीटर वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टीकडे सरकत आहे. चेन्नई शहरापासून हे चक्रीवादळ दक्षिण-पूर्व दिशेला सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गानुसार ते शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दक्षिणेकडे किनारपट्टीला धडकणार आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोट्टापासून काही अंतरावर चक्रीवादळ जमिनीवर येण्याचा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा ताशी वेग ८० किलोमीटरपर्यंत जाणार आहे. परिणामी आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तमिळनाडू आदी भागांमध्ये ९ आणि १० डिसेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर कर्नाटक आणि केरळमध्येही पाऊस होणार आहे.

हेही वाचा- पुणे : पिंपरी पालिकेत मानधनावरील शिक्षक भरतीसाठी ८५० जणांचे अर्ज

दक्षिणेकडील राज्यांबरोबरच चक्रीवादळाची ही प्रणाली महाराष्ट्रात परिणाम करणार आहे. दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत तुरळक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र ओलांडून थेट मध्य प्रदेशपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा- ‘बिळातून बाहेर येऊन म्हणा हे राज्यपाल नकोत’; छत्रपती संभाजीराजेंचा शिंदे- फडणवीसांना टोला

विदर्भात गारवा, इतरत्र तापमानवाढ

राज्यात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट झाली असली, तरी विदर्भ वगळता सर्वत्र तापमान सरासरीच्या पुढे आहे. त्यामुळे विदर्भात सध्या हलका गारवा आहे. गोंदिया येथे गुरुवारी राज्यातील नीचांकी १०.२ अंश किमान तापमानाची नोंद झाली. चक्रीवादळाच्या परिणामाने सध्या काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात मात्र घट होत आहे. कमाल तापमान सर्वत्र सरासरीखाली आले आहे. गेल्या तीनचार दिवसांत मुंबईसह कोकणात उन्हाचा चटका वाढून कमाल तापमान देशात उच्चांकी ठरले होते. या विभागातही आता तापमानात घट होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a possibility of rain anytime till december 15 in the state due to cyclone in bay of bengal pune print news pam 03 dpj
First published on: 08-12-2022 at 20:49 IST