पुणे : खडकवासला धरण परिसरातील ओसाडे, निगडे या गावातील तीन रिसाॅर्ट जलसंपदा विभागाकडून मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले. तसेच चौपाटी परिसरातील तीस दुकानांवरही कारवाई करण्यात आली.

खडकवासला धरण परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून अनेकांनी दुकाने थाटली. रिसॉर्ट, फार्महाऊस बांधले आहेत. मात्र, त्यावर कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही खडकवासला धरण परिसरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही यासंदर्भात कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक, पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर वेगाने सूत्रे हलली आणि कारवाईला सुरुवात झाली.

धरण परिसरात एकूण ६५ अतिक्रमणे आहेत. त्यात दुकानांसह ह़ॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस यांचा समावेश आहे. जलसंपदा विभागाकडून सोमवारी चौपाटी परिसरातील तीस दुकानांवर कारवाई करण्यात आली.कारवाईवेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मंगळवारी वेल्हे तालुक्यातील ओसाडे, निगडे या गावातील धरणालगत असलेले तीन रिसॉर्ट पाडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गोठा बांधण्यात आला. त्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.