पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला धडक दिली. त्यानंतर मोटार पुण्याकडे येणाऱ्या मोटारीवर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेसह तिघे जण पुण्यातील आहेत. अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिया सागर इंगुळकर (वय ३५, रा. टिळक रस्ता, १०४१, शुक्रवार पेठ), निलेश संजय लगड (वय ४२), श्राव्या निलेश लगड (वय १२, दोघे रा. गिरिजाशंकर अपार्टमेंट, सदाशिव पेठ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत सागर पांडुरंग इंगुळकर (वय ४०) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अपघातात शरयू लगड, रुद्राक्ष लगड, अंशिका मोगल, आरव मोगल, अर्श लगड, अर्षित लगड, तसेच मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील अश्विनी रमेश जाडकर (वय ४३), ओमकेश रमेश जाडकर (वय २३), सुमीत तुकाराम कदम (वय २४), पुष्कर लक्ष्मण शेळकंदे (वय २५), जिग्नेश रमेश जाडकर (वय १२), संजय नामदेव वाल्हेकर (वय ४२), विमल नामदेव वाल्हेकर (वय ६९, सर्व रा. भिवंडी, जि. ठाणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगड आणि इंगुळकर हे नातेवाईक आहेत. ते कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते. रविवारी रात्री जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन ते मोटारीतून पुण्याकडे परतत होते. त्या वेळी मुंबईकडे भरधाव वेगात ट्रक निघाला होता. मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या वेळी मोटारचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार पुण्याकडे येणाऱ्या मोटारीवर आदळली.

अपघातात सागर इंगुळकर यांची पत्नी प्रिया, साडू निलेश लगड आणि त्यांची मुलगी श्राव्या गंभीर जखमी झाले. मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील चालकासह सात जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people from pune died in a truck hit on the mumbai pune highway 14 people were injured in the accident pune print news ssb