पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी (३० ऑगस्ट) रात्री ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे रात्री हवेत गारवा निर्माण झाला होता. बुधवारी (३१ ऑगस्ट) गणेशाच्या आगमनालाही हलक्या सरींचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑगस्टच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली होती. आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दुपारी कडक ऊनही जाणवत आहे. आठवड्यापूर्वी शहरातील दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा २५ ते २७ अंश सेल्सिअसच्या आसपास होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

तीन दिवसांपासून ३० अंशांपर्यंत तापमानाचा पारा वाढला. तो मंगळवारी थेट ३२.६ अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे दुपारी काही प्रमाणात उकाड्याची स्थिती जाणवत होती. दिवसभरात काही वेळेला उन्हाचा कडाका, तर काही वेळेला आकाशात ढगाळ स्थिती निर्माण होत होती. संध्याकाळी उशिरा शहराच्या दक्षिण-पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर ढग येत होते. रात्री नऊनंतर शहरात काही भागांत पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास काही भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, बुधवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.  त्यानंतरही तीन ते चार दिवस हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thunderstorms with heavy rainfall in pune at night pune print news zws