पुणे : भारतीय रेल्वे प्रवास आजपासून (१ जुलै) महागला असला, तरी प्रवाशांच्या आरक्षणाबाबत शेवटच्या क्षणापर्यंतची अनिश्चितता दूर करण्यासाठी आता चार तासांऐवजी आठ तास अगोदर तिकीट आरक्षण यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ‘तत्काळ आरक्षण’ सुविधेचा लाभ गरज असलेल्या प्रवाशालाच मिळावा म्हणून ‘आधार’ क्रमांक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

रेल्वे बोर्डाने ‘प्रवासी आरक्षण प्रणाली’त आठवडाभरापूर्वी बदल सुचविले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बदलांना संमती दर्शवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. आजपासून (१ जुलै) याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने आता गाडी निघण्यापूर्वी आठ तास अगोदर तिकीट आरक्षणाची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठीचा अवधी मिळणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले.

‘पहाटे सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रवासी आरक्षण यादी एक दिवस अगोदर रात्रीच तयार केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लवकर माहिती मिळणार असून, प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नाही. पर्यायी रेल्वेचे आरक्षण करण्यासाठीही अवधी मिळणार आहे.’ असे बेहरा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘तत्काळ आरक्षण’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांची आधार पडताळणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशाच्या नावाने रेल्वेच्या संकेतस्थळावर खाते बंधनकारक असणार आहे.

प्रतिमिनिट दीड लाख तिकिटांचे आरक्षण

‘रेल्वेची ‘प्रवासी आरक्षण प्रणाली’ (पीआरएस) अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे मिनिटाला दीड लाख प्रवाशांचे तिकीट आरक्षित होणार आहे. सध्या दर मिनिटाला ६५ ते ७० हजार प्रवाशांचे तिकीट आरक्षण होते. डिसेंबर अखेरपर्यंत ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असून, ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेता येणार आहे,’ असे बेहरा यांनी सांगितले.