नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत
पिंपरी- चिंचवड: पर्यटन नगरी असलेल्या लोणावळा मध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या २४ तासात तब्बल २२१ मिलिमीटर म्हणजे ८.७० इंच पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ३२३ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने आजच्या दिवसापर्यंत १ हजार १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लोणावळ्यांमधील नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. भुशी धरणारणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये पर्यटक दाखल होत आहेत, गर्दी करत आहेत.
प्रशासनाने प्रतिबंध केल्याने लोणावळ्यातील अनेक ठिकाणी पर्यटकांना जाता येत नाही. तरीही पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण, लाईन्स पॉईंट, टायगर पॉईंट अशा ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत. सह्याद्रीच्या डोंगरदर्यावर हिरवळ पसरली आहे. पांढरे शुभ्र धबधबे वाहत आहेत. या निखळ सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत.