रस्त्यावर पैसे पडल्याची बतावणी करून मोटारीतून अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना जंगली महाराज रस्त्यावर घडली.
याबाबत एका मोटारचालक तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी बालेवाडी भागात राहायला आहे. तरुणी कामानिमित्त जंगली महाराज रस्त्यावर आली होती. तिने मोटार रस्त्याच्या कडेला थांबविली होती. त्या वेळी चोरटा मोटारीजवळ आला आणि मोटारीतील तरुणीकडे बतावणी केली. रस्त्यावर पैसे पडले आहेत, असे चोरट्याने सांगितले. त्यानंतर तरुणी मोटारीतून बाहेर आली.
गडबडीत ती दरवाजा बंद करायची विसरली. चोरट्याने संधी साधली. मोटारीतील सोन्याचे कडे, साडेचार हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असा दोन लाख ५५ हजारांचा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला. तरुणीने या घटनेची पोलिसांना दिली. पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.