पुणे : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन व्यक्तींचा पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नदी, ओढय़ांना पूर आल्याने ५२१ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, तर १६१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शेतपिके, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा

यंदाच्या हंगामात पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला आहे. १७ ऑक्टोबरला रात्री पावणेदहा ते एक वाजेपर्यंत मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाली. पुणे शहरातील दोन मंडळे, हवेली, भोर, जुन्नर आणि इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी एक मंडळ, आंबेगाव, शिरूर दोन, बारामती तीन, दौंड सहा आणि पुरंदर तालुक्यातील पाच अशा १०० मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. भोर तालुक्यात धनंजय अशोक शिरवले (२४) हा युवक भोर शहरालगत नीरा नदीमध्ये पुलालगत सकाळी दहा वाजता मृत आढळून आला. तसेच पुरंदर तालुक्यात मौजे पांडेश्वर गावातील अजय व्यंकट शिंदे (४०) ही व्यक्ती पाण्यात बुडून मृत पावली आहे.

हेही वाचा >>> तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”

भोर तालुक्यात वीज पडून ४० कोंबडय़ा मृत झाल्या आहेत. कच्ची सात घरांची पडझड झाली असून १२९.७१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. जुन्नरमध्ये मौजे पिंपरी पेंढार येथील गायमुखवाडी येथील १३ घरे आणि दोन गोठय़ांत पाणी शिरले होते. या सर्वाना स्थलांतरित करण्यात आले आहे. आंबेगावमध्ये मौजे मांदळवाडी ते मौजे सिवदणे (शिरूर) येथील जिल्हा परिषदेचा रस्ता वाहून गेला. वनविभागाच्या क्षेत्रातून एक किलोमीटर लांबीचा कच्चा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिरूर तालुक्यात एका कुटुंबातील चार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. वीज पडून एक गाय आणि १७ शेळय़ा मृत झाल्या आहेत. एक पक्के, तर २४ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. बारामती तालुक्यात कऱ्हा नदीला पूर आल्याने अंजनगाव कऱ्हावागज रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे ११७ कुटुंबातील ५१७ व्यक्ती, तर १६१ जनावरांचे  तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. वीर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने १२१५ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

इंदापूर तालुक्यात कळंब-नातेपुते रस्त्यावरील निरा नदीपुलावरून ओंकार दुर्योधन हाके (१८) हा युवक नातेपुतेकडे दुचाकीवरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. या युवकाला बोरकरवाडी येथे स्थानिकांनी बाहेर काढले असून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तावशी, जांब, कुरवली, कळंब, निमसाखर, निरवागी येथील बंधारा पूल तसेच रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यात कच्ची ५१ आणि एका गोठय़ाचे नुकसान झाले.

नुकसान..

मृत व्यक्ती दोन, स्थलांतरित कुटुंबे ११८ (५२१ व्यक्ती), स्थलांतरित पशुधन १६१, घरात पाणी शिरले ३०, घरांची पडझड एक आणि अंशत: कच्ची घरे ८५, मृत पशुधन लहान व मोठी १९, शेतीपिकांचे नुकसान २५१.२१ हेक्टर, मृत कोंबडय़ा ४०

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two persons died due to heavy rains in pune district zws