पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमध्ये झालेल्या पार्टीतील दोन तरुणांनी बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, समाजमाध्यमात प्रसारित झालेल्या चित्रफितीतील ‘त्या’ तीन तरुणांना शोधण्यात अद्याप पोलीस अपयशी ठरले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारचा परवाना रद्द केला आहे.

या बारमध्ये रविवारी मध्यरात्री बेकायदा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच पार्टीत अल्पवयीन मुले सामील झाली होती. समाजमाध्यमात एल थ्री बारमधील पार्टी आणि प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. पोलिसांनी लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रजनीगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. ३०२, साईप्रसाद अपार्टमेंट लेन नं. १० मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवि माहेश्वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजेस्टिक, उंड्री), पार्टीचे आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), ध्वनिक्षेपक यंत्रणा सांभाळणारा (डीजे) दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तसेच पार्टीचे आयोजन करणारे रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस मलिक (वय ३३, रा. फ्लॅट नं. ४२, जयजवान नगर, राम मंदिराजवळ, येरवडा) यांना अटक केेली.

पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. दोन तरुणांनी बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. बारमध्ये बेकायदा पार्टीचे आयोजन आरोपी अक्षय कामठे याने केले होते. पार्टीसाठी ऑनलाइन, तसेच रोख स्वरुपात शुल्क स्वीकारण्यात आले होते. समाजमाध्यमात कामठे याने पार्टीची जाहीरात प्रसारित केली होती. पार्टीत सामील झालेल्या ४० ते ४५ जणांची पोलिसांनी चाैकशी केली. पोलिसांनी आठ आरोपींपैकी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच पार्टीत सामील झालेल्या काहीजणांचे रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. पार्टीत सामील झालेल्या दोन तरुणांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, समाजमाध्यमात प्रसारित झालेल्या चित्रफितीतीतील ‘त्या’ तीन तरुणांना शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.

हेही वाचा >>>ड्रग्स व्हायरल प्रकरण : फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेलवर पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई

हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी एल थ्री बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने सहा कर्मचाऱ्यांना (वेटर) अटक केली. कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक अनंत पाटील आणि विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालायचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली.

मद्यालयाच्या मंजूर नकाशात बदल

फर्ग्युसन रस्त्यावरील इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हाॅटेल रेनबोला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या रेनबो हाॅटेलचे नाव बदलण्यात आले असून, एल थ्री बार नावाने तेथे व्यवसाय करणात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाहणी केली. तेव्हा परवाना कक्षात गंभीर स्वरुपाचे फेरबदल करण्यात आले आहे. परवाना कंक्षात अंतर्गत बदल करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने परवान्याचे तत्काळ निलंबन करून बार लाखबंद (सील) करण्यात आला.