पुणे : विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे, तपशील अद्ययावत करून घेण्याचे शिक्षकांचे काम कमी होण्याची आहे. आधार प्राधिकरणाने केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सहकार्याने यूडायस प्लस प्रणालीमध्ये सुविधा विकसित करून दिली असून, त्याद्वारे आधार अद्ययावत नसलेल्या विद्यार्थ्यांचा तपशील उपलब्ध होणार आहे. तसेच आधार अद्ययावतीकरण प्रलंबित असलेल्या देशभरात १७ कोटी विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्येच आधार शिबिर आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी या बाबत राज्यांच्या मुख्य सचिव पत्राद्वारे अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरण प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात शालेय शिक्षण विभागाने आधार कार्डवर आधारित संचमान्यता लागू केली आहे. त्यामुळे राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या वैध आधार कार्डसाठी प्रयत्न करण्यात येतात.
मात्र, काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे नसणे, कागदपत्रांमध्ये तांत्रिक चुका असणे अशा प्रकारांमुळे वैध आधार कार्ड तयार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील सुमारे ४.५ टक्के विद्यार्थी विविध तांत्रिक कारणांनी आधार अवैध ठरल्याचे शिक्षण विभागाच्या संचमान्यता संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
भुवनेश कुमार यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात शाळांमध्ये आधार अद्ययावतीकरणासाठी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. ५ ते १५ या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये बायोमॅट्रिक तपशील समाविष्ट करणं आवश्यक आहे. ते न केल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात, योजनांसाठीच्या प्रमाणीकरणात, नीट, जेईई, सीयूईटी अशा परीक्षांच्या नोंदणीत अडचणी येऊ शकतात.
विद्यार्थी, पालक ऐनवेळी आधार कार्ड अद्ययावतीकरणासाठी गेल्यास ते होत नाही. त्यामुळे वेळीच आधार अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे.शाळांनी आधार अद्ययावतीकरणासाठी शिबिर आयोजित केल्यास बायोमेट्रिक तपशील अद्ययावत करणे बाकी असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना उपयोग होईल. देशभरातील १७ कोटी विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावतीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे तपशील आधार कार्डमध्ये अद्ययावत करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळांमध्ये आधार अद्ययावतीकरणासाठी शिबिरे आयोजित करणे हा अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. कारण या पूर्वी तालुकास्तरावर अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा झाल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. जुन्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी जाणे, जन्म दाखल्याबाबत अडचणी आणि अन्य तांत्रिक बाबीसाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरून संबंधित विद्यार्थी आधार वैध होतील. तसेच त्यांना त्या प्रमाणात त्यांना शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षण व्यवस्था सक्षम होईल.
शाळांमध्येच आधार कार्डसाठी शिबिरे आयोजित केल्यास शिक्षकांचे काम कमी होईल. महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक