पुणे : देशाची निर्यात कशी वाढेल, आयात कशी कमी होईल, भविष्यकालीन तंत्रज्ञानावर आधारित देश घडवण्याचा विचार शिक्षण संस्थांना करावा लागेल. येत्या काळात गरजाधिष्ठित, कच्च्या मालावर आधारित, स्थान केंद्रित संशोधन गरजेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
बृहन्ममहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुलाचे उद्धाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गडकरी बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद गोसावी, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, माजी विद्यार्थी आणि उद्योजक पुरुषोत्तम लोहिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, विश्वस्त जगदीश आदी या वेळी उपस्थित होते. लोहिया यांनी दिलेल्या देणगीतून वास्तूची उभारणी करण्यात आली आहे.
गडकरी म्हणाले, की फर्ग्युसन कॉलेजचे नाव जगभर आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व्यावसायिक उद्देशाने चालवली नाही, पण शिक्षणाची गुणवत्ता राखण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर, पंतप्रधान व्ही. पी. सिंह, पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासारखे अनेक लोक डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दिले. तत्त्व, अर्थव्यवस्था, पर्यावरण हे शिक्षणाचे तीन स्तंभ आहेत. देशाला शाश्वत करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे. शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या जोरावर अर्थव्यवस्था सक्षम करणे, आदर्श राष्ट्रनिर्मिती करायची आहे. देश विश्वगुरू होण्यासाठी ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करणे आवश्यक आहे. ज्ञान प्राप्तीशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकत नाही. अध्यात्मिक विज्ञान, योग, आयुर्वेद, मूल्याधिष्ठित कुटुंब पद्धतीविषयी जगभरात आकर्षण आहे. अर्थव्यवस्था सर्वांत वेगाने वाढणारी. अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानात देशातील मुलांनी देशाचे नाव केले आहे. ज्ञान घेऊन परदेशात गेलेल्यांनी देशाची प्रतिष्ठा वाढवली. त्याचे मूळ त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात आहे. त्यामुळे देशातील शिक्षण संस्था, शिक्षक, पालकांना श्रेय द्यावे लागेल. गुणवत्तेवर कोणाचे पेटंट नाही. माणूस जातीने नाही, तर गुणांनी मोठा असतो. भेदभाव करणारी आपली संस्कृती नाही. भविष्यातील भारत घडवण्यासाठी ज्ञान, संस्कार, तंत्रज्ञानासह तत्वज्ञानाची बैठक आवश्यक आहे.
ऑटोमोबाइल क्षेत्रात भारताने जपानला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले. पाच वर्षांत पहिल्या क्रमांकावर. पाच वर्षांत सर्व बसेस इलेक्ट्रिकच्या असतील. देशाची निर्यात कशी वाढेल, आयात कशी कमी होईल, भविष्यकालीन तंत्रज्ञानावर आधारित देश घडवण्याचा विचार शिक्षण संस्थांना करावा लागेल. येत्या काळात गरजाधिष्ठित, कच्च्या मालावर आधारित, स्थान केंद्रित संशोधन गरजेचे आहे.
पाटील म्हणाले, की नवीन शैक्षणिक धोरणानुसार काळानुरूप नवे अभ्यासक्रम सुरू करणे अपेक्षित आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीला स्वायत्त विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याच्या दिशेने आहोत. महाविद्यालये स्वायत्त होऊन लवचिक अभ्यासक्रम निर्माण होणे अपेक्षित आहे. समाजाचीगरज पूर्ण करणारे विद्यापीठ विद्यापीठ व्हावे.