पुणे : विकसनासाठी घेतलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प बांधल्यानंतर परस्पर सदनिकेची विक्री करून जमीन मालकाची फसवणूक केल्या प्रकरणी आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकरसह तिघांविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर यांच्यासह महेश रामचंद्र तिखे, अविनाश पवार यांच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात ज्येष्ठ नागरिकाची जमीन आहे. गृहप्रकल्प बांधण्यासाठी जमिन विकसनासाठी देण्यात आली होती. त्याबदल्यात आंदेकर आणि त्याच्या ओळखीतील दोन बांधकाम व्यावसायिक ज्येष्ठ नागरिकासह त्याच्या कुटुंबीयांना काही सदनिका देणार होते.
मात्र, आरोपींनी परस्पर सदनिकांची विक्री करुन त्यांची फसवणूक केली, तसेच बनावट खरेदी दस्त तयार करुन बँकेकडून कर्ज घेतले, असे जमीन मालक ज्येष्ठ नागरिकाने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत. नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता.
आयुष कोमकर खून प्रकरणात या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), अमन युसूफ पठाण (वय २५), सुजल राहुल मेरगु (वय २०), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ३६), मुनाफ रिजाय पठाण (वय २८, सर्व रा. नाना पेठ), माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर, वनाराज आंदेकरची पत्नीला अटक करण्यात आली होती. नाना पेठेतील मासळी बाजारातील विक्रेता, तसेच एका बांधकाम व्यवासायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी आंदेकरसह साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.