पुणे : दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून एका महिलेने ३५ हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना वडगावशेरी भागात घडली. या प्रकरणी महिलेविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एका सराफ व्यावसायिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावसायिकाची वडगावशेरीतील गणेशनगर भागात सराफी पेढी आहे. मंगळवारी (९ सप्टेंबर ) दुपारी एकच्या सुमारास सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने एक महिला शिरली. महिलेने सराफी व्यावसायिकाला अंगठी दाखविण्यास सांगितले. सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून महिलेने प्लास्टिक ट्रेमध्ये ठेवलेली ३५ हजारांची सोन्याची अंगठी चोरली. महिलेने जाकीटमधील कप्यात अंगठी ठेवली. त्यानंतर ती सराफी पेढीतून पसार झाले. काही वेळानंतर सराफ व्यावसायिकाने अंगठी ठेवलेल्या ट्रेची पाहणी केली. तेव्हा अंगठी चोरल्याचे उघडकीस आले.
सराफी पेढीतील चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा महिलेने सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून अंगठी चोरल्याचे दिसून आले. पोलीस हवालदार देशपांडे तपास करत आहेत.वडगाव शेरी, लष्कर भागातील सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याचे दागिने चोरण्याच्या घटना दोन महिन्यांपूर्वी घडल्या होत्या. या प्रकरणी महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
टिळक रस्त्यावर पीएमपी प्रवाशाकडील रोकड लंपास
पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून ४५ हजारांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुण शेतकरी असून, परभणी जिल्ह्यातील धानोरा गावात राहायला आहे. तरुण कामानिमित्त पुण्यात आला होता. टिळक रस्ता परिसरात पीएमपी प्रवासी तरुणाच्या खिशातून ४५ हजारांची रोकड चोरुन नेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.