पुणे : मुलांना कविता म्हणून दाखवत, गोष्टी सांगत, जुन्या आठवणींना उजाळा देत मान्यवर लेखकांनी त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा सांगितल्या. मोबाइलपासून दूर राहून भरपूर वाचन करण्याचे आवाहन करतानाच ‘पुणे बालपुस्तक जत्रा’ या संकल्पनेचे कौतुक केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रेत शुक्रवारी दिवसभरात विविध उपक्रम झाले. त्यात चैताली माजगावकर यांचा ‘हा खेळ सावल्यांचा’ हा पपेट शो, अभिजात मराठी भाषिक खेळ, पुणे मराठी ग्रंथालयाच्या बालविभागातील मुलांनी लिहिलेल्या कथांचे सादरीकरण, अथांग मुजुमले पाटील याने केलेले शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक सादरीकरण यांचा समावेश होता. तसेच ‘लेखक तुमच्या भेटीला’ या सत्रात बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, ज्येष्ठ लेखिका संगीता बर्वे, ज्येष्ठ चित्रकार आणि साहित्यिक ल. म. कडू यांनी सहभाग घेतला. प्रसाद मिरासदार यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

कावळ्याने खाल्ल्या शेवया ही गोष्ट आणि कविता आव्हाड यांनी सादर केल्या. ‘मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकतानाच वाचनाची आवड लागली. त्यातून कथानकथन करू लागलो. त्यानंतर ठरवून शिक्षक झालो. शाळेत मुलांना गोष्टी सांगू लागलो, कविता म्हणून दाखवू लागलो. माझ्या कथा-कवितांचे विषय मुलांकडूनच मिळतात. आजची मुलांचे भावविश्व बालसाहित्यात येणे महत्त्वाचे आहे. मुलांना बालसाहित्याशी जोडणे, मुलांमध्ये वाचनाची प्रक्रिया रुजवण्यासाठी ‘बालपुस्तक जत्रा’ महत्त्वाची आहे,’ असे आव्हाड म्हणाले.

संगीता बर्वे यांनी ‘वाचा हो वाचा पुस्तक’, ‘झाड आजोबा’, ‘खारुताई आणि सावलीबाई’ अशा कविता मुलांना सोबत घेऊन सादर केल्या. ‘माझे लेखन लहान असतानाच सुरू झाले. चौथीत असताना पहिल्यांदा कविता लिहिली होती. लहानपणी वाचलेले, ऐकलेले दीर्घकाळ लक्षात राहते,’ असे त्यांनी सांगितले. ल. म. कडू यांनी त्यांच्या ‘खारीचा वाटा’ या कादंबरीविषयी, त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.