लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: वारजे-एनडीए रस्त्यावर बेकायदा भाजीपाला, फळे विक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षकाला धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली.

नवनाथ बाळासाहेब वांजळे (वय ३२), रोहन मल्हारी माळशिखरे (वय १८), सुभाष मारुती बोडके (वय ४०, तिघे रा. शिवणे, एनडीए रस्ता), गणेश गोरबा हुंबरे (वय ३०, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अंकुश वादाड (वय ३१, रा. सासवड) यांनी या संदर्भात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वारजे-एनडी रस्त्यावर बेकायदा भाजीपाला आणि फळे विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिकेचे अतिक्रमण विभागातील पथक गेले होते.

त्या वेळी सहायक निरीक्षक वादाड आणि पथकातील कर्मचाऱ्यांवर भाजी-फळे विक्रेत्यांनी हल्ला चढविला. वादाड यांना बांबुने मारहाण करण्यात आली. पथकातील कर्मचाऱ्यांना भाजी ठेवण्यासाठी वापरले जाणाऱ्या प्लास्टिकच्या जाळ्या (क्रेट्स) फेकून मारण्यात आल्या. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable sellers attack on municipal encroachment team pune print news rbk 25 mrj