लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चिंचवडगावातून थेरगावाच्या दिशेने मोठ्या वाहनांना जाण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या पवना नदीवरील फुलपाखरू (बटरफ्लाय) आकारातील पुलाचे काम २०१७ पासून सुरू असून, मुदत संपल्यानंतरही ते अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला दिवसाला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. या महिनाअखेरीस पुलाचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

थेरगाव येथील प्रसूनधाम हौसिंग सोसायटीशेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील थेरगाव-चिंचवड रस्त्यावर हा फुलपाखरू पूल बांधण्याचे काम महापालिकेने २०१७ मध्ये हाती घेतले. निविदा खर्च २५ कोटी १९ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला असताना १४ टक्के अधिक दराने धनेश्वर कन्स्ट्रक्शनला पुलाचे बांधकाम देण्यात आले होते. पुलाची लांबी १०७ मीटर, तर रुंदी १८ मीटर आहे. १८ महिन्यांच्या मुदतीत पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामास ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

या कामात मुख्य पुलाचे काम, तसेच पोहोच रस्त्याच्या कामाचा अंतर्भाव करण्यात आला होता. तथापि, या कामासाठी जलसंपदा विभागाच्या तरतुदीनुसार, पुलाच्या उंचीचे नियोजन करून मुख्य पुलाचे आरेखन करण्यात आले. त्यानुसार पुलाच्या उंचीत वाढ करावी लागली. त्यामुळे मूळ कामाच्या परिमाणात वाढ झाल्याने मूळ निविदा रकमेमध्ये पुलाचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगत उर्वरित काम करण्याकरिता नवीन अंदाजपत्रक तयार केले.

पुलासाठी थेरगाव बाजूकडील रस्त्यास भिंत बांधणे, मुरुम भराव करणे, रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण, तसेच चिंचवड बाजूकडील रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण आणि दिशादर्शक फलक अशी कामे पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ११ कोटी तीन लाख रुपयांचे काम ठेकेदाराला देण्यात आले. ऑगस्ट २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. कामाची मुदत सप्टेंबर २०२४ पर्यंत होती. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ७ सप्टेंबर २०२४ पासून प्रतिदिवस दहा हजार रुपयांचा दंड आकारणी सुरू केली आहे. २६ जानेवारी २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या हाेत्या. परंतु, या कालावधीतही काम पूर्ण झाले नाही. अजूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुलाच्या दोन टप्प्यांतील कामावर ३९ कोटी ७४ लाख रुपये खर्च होऊनही नागरिकांना पुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ठेकेदार, सल्लागारावर कारवाईची मागणी

फुलपाखरू पुलाच्या कामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत केला. पुलावर ३९.७४ कोटी रुपये खर्च करूनही सात वर्षांत काम पूर्ण का झाले नाही. या प्रकरणाची चौकशी टाटा कन्सल्टन्सी किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) तज्ज्ञांमार्फत करावी. ठेकेदार, सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली.

मुदतीत काम पूर्ण न झाल्यामुळे ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ७ सप्टेंबर २०२४ पासून दिवसाला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. दंडाची रक्कम देयकामधून वसूल केली जाईल. मार्चअखेर काम पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता किरण अंधुरे यांनी सांगितले.