Pune Municipal Corporation: पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती- सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. येत्या गुरुवारी (११ सप्टेंबर) आणि शुक्रवारी (१२ सप्टेंबर) ही सुनावणी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांच्यासमोर नागरिकांकडून आलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना मुदत देण्यात आली होती. ४ सप्टेंबरपर्यंत ही मुदत होती. या मुदतीमध्ये महापालिकेकडे सुमारे ६ हजार हरकती- सूचना नोंदविण्यात आल्या. हरकती नोंदविण्याच्या अखेरच्या दिवशी तर साडेतीन हजार हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यासाठी सनदी अधिकारी व्ही. राधा यांची राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासमोर प्रत्येक हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. यानंतर प्रारूप प्रभाग रचनेमध्ये नक्की काय बदल करायचे, याचा अहवाल सनदी अधिकारी व्ही. राधा देतील. यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.

अशी आहे प्रारूप प्रभाग रचना

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. पालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला होता; पण उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे राज्य सरकारने वगळली आहेत. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यामुळे माजी नगरसेवकासह इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गटाला प्रभाग रचना अनुकूल झाल्याचा आरोप केला जात आहे.

नागरिकांकडून आलेल्या हरकती आणि सूचनांवर ११ आणि १२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे ही सुनावणी घेतली जाईल. प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक २९ यांची सुनावणी ११ सप्टेंबरला,  तर प्रभाग क्रमांक ३० ते ४१ या प्रभागांवरील हरकती आणि सूचनांची सुनावणी १२  सप्टेंबरला होणार आहे. या सुनावणीसाठी ज्या  नागरिकांनी हरकती आणि सूचना नोंदविल्या आहेत.  त्यांना प्रत्यक्ष तेथे उपस्थित रहावे लागणार आहे. नागरिकांनी सुनावणीसाठी कधी उपस्थित रहायचे, याचे  प्रभागनिहाय वेळापत्रक महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. तसेच प्रत्येक हरकत नोंदविणाऱ्याला पत्र देखील महापालिकेने पाठवले आहे.

प्रभाग रचनेबाबत नोंदविलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होणार आहे. प्राधिकृत अधिकारी व्ही. राधा यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. हरकत घेणाऱ्यांना सुनावणीसाठी कधी उपस्थित राहायचे, याबाबत पत्र दिले देण्यात आले आहे. प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका