पुणे : बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध असून, देशांतर्गत बाजारातूनही मागणी घटली आहे. मागणीअभावी आंबेमोहर, लचकारी कोलम तांदळाच्या दरात सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलमागे घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे तांदूळ पडून आहे.

हंगामाच्या सुरुवातीस, तांदूळ काढणीच्या काळात बाजारात नव्याने मोठ्या प्रमाणावर तांदूळ येत असतो. त्या वेळी तांदळाचे दर कमी असतात. उन्हाळ्यात बाजारात तांदळाचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे उन्हाळ्यात तांदळाच्या दरात काहीशी वाढ होते. हंगामाच्या सुरुवातीस होलसेल बाजारात आंबेमोहरचे दर सात ते आठ हजार प्रतिक्विंटल होते. सध्या ६,७०० ते ७,५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. लचकारी कोलमचे दर हंगामाच्या सुरुवातीस ६,५०० ते ७००० रुपये होते. सध्या ६२०० ते ६८०० रुपये दर आहे. इंद्रायणी तांदळाचे उत्पादन आणि बाजारातील उपलब्धता कमी असल्यामुळे इंद्रायणीच्या दरात चढ-उतार झालेला नाही.

हेही वाचा >>>घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण

आंबेमोहर प्रामुख्याने महाराष्ट्रात उत्पादित होत असे; पण निर्यातीला मागणी वाढल्यामुळे मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात आंबेमोहरची लागवड वाढली होती. लचकारी कोलम तांदळाचे उत्पादन मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये होते. बिगरबासमती तांदूळ आखाती देशांसह अमेरिका आणि युरोपीय देशांत जातो. पण बिगरबासमती तांदळावर बंदी असल्यामुळे अपेक्षित मागणी नाही. देशांतर्गत बाजारात जेमतेम मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे तांदूळ पडून आहे, अशी माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

किरकोळ विक्री दरात घट नाही

आंबेमोहर, लचकारी कोलमच्या होलेसल दरात प्रतिक्विंटल सरासरी ५०० रुपयांची घट झाली आहे. पण, किरकोळ बाजारात दर कमी झालेले नाहीत. किरकोळ बाजारात आंबेमोहर ७२ ते ८० रुपये आणि कोलम ५२ ते ७८ रुपये प्रतिकिलो आहे, अशी माहिती व्यापारी उदय चौधरी यांनी दिली.

नवे सरकार आल्यानंतरच दिलासा ?

आंबेमोहर आणि कोलमच्या दरात प्रतिक्विंटल सरासरी ५०० रुपयांनी घट झाली आहे. व्यापाऱ्यांनी नुकतीच केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन तांदूळ, गहू, साखर आणि कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी केली. पण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत याबाबत कोणताही निर्णय होणार नाही, असे गोयल यांनी सांगितले आहे, अशी माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.