पुणे : जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच शहर आणि परिसरात तसेच जिल्ह्यातही अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळला. सध्याही कमी-्अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मोठी फौज कार्यरत ठेवण्यात आली आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलातील चार हजार २७५ अभियंते, कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार आणि कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध धोके पत्करून, पण सुरक्षेची काळजी घेत अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मोठ्या पावसातही पूर्वीच्या तुलनेत यंदा उच्चदाब वाहिन्यांतील बिघाडाचे प्रमाण कमी होऊ शकले.

मुसळधार पाऊस किंवा अन्य संबंधित कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी असावा. त्यासाठी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे कामदेखील लवकरात लवकर करण्यात यावे असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार बैठकीत दिले होते. त्यानुसार पावसाळ्यात कर्मचाऱ्यांची सज्जता ठेवण्यात आली आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात काही उच्च व लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांना धक्का पोहोचल्याचे परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहेत. तसेच काही ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या रस्ता रुंदीकरणात किंवा क्रॉन्क्रिटीकरणामध्ये रस्त्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच रस्त्याची उंची वाढवल्यामुळे कडेला असलेले फिडर पीलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे.

वीज यंत्रणेवर किंवा सर्व्हिस वायरवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. तर शहर व ग्रामीणमधील काही खोलगट, सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवण्यात येत आहे. सिमेंटच्या रस्त्याखाली गेलेल्या वाहिनीत दोष असल्यास पर्यायी वाहिनी टाकणे, खांबावरील वाहिन्यांवर झाड्याच्या फांद्या पडल्यास त्या बाजूला करून दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना कधी अत्यंत अडचणीच्या ठिकाणी किंवा साचलेल्या किंवा प्रवाह सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यात उतरून अभियंते, जनमित्र मदतकार्य करीत आहेत. दुरुस्ती कामांमध्ये महिला अभियंता, कर्मचारी देखील भर पावसात कार्यरत आहेत.

नाल्याच्या पात्रात उतरून वीजपुरवठा सुरळीत

लोणावळामध्ये आयटीआय महाविद्यालयाच्या मागे असलेल्या कालव्यालगत खांबावरील वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे उच्चदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. महावितरणचे जनमित्र दिनेश मिस्त्री आणि नितीन पितले यांनी कंबरभर पाण्यातून सुमारे ६०० मीटर वाट काढत पाण्याच्या प्रवाहात असलेल्या वीजखांबावर चढून दुरुस्तीचे काम केले. त्यांनी अवघ्या दीड तासात ग्राहकांचा वीजपुवरठा पूर्ववत केला.